Mumbai Crime - महागडा मोबाईल घ्यायचा असल्याने त्याने घरातून कोणाला काही न सांगता पैसे नेले. मोबाईल घेण्यासाठी उत्तर प्रदेश वरुन मुंबई गाठत काकाच्या घरी आला. त्या पैशांतून मोबाईल देखील घेतला.
वडिलांना हे समजताच त्यांनी मुलाला विचारणा करत राग दिला. वडिल रागावल्याने घाबरलेल्या मुलाने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे.
कल्याण पत्रीपूल परिसरात एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत या मुलाचा मृतदेह आढळून आला. हे समजताच बघ्यांनी पत्रीपूल परिसरात एकच गर्दी केली होती. यामुळे येथे बराच वेळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. ही कोंडी सोडविण्यासाठी पाच तास पोलिसांना कसरत करावी लागली.
कल्याण मधील पत्रिपुल परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास रेल्वे रुळाशेजारी एका मुलाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. महात्मा फुले चौक पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत मुलाची ओळख पटली असून राजवर्धन यादव (वय 17) असे मृत मुलाचे नाव आहे.
उत्तर प्रदेश येथील गाजीपूर येथे त्याचे कुटूंब रहाते. राजवर्धन नुकताच बारावी पास झाला होता. त्याला महागडा मोबाईल घ्यायचा होता म्हणून त्याने कोणालाही काही एक न सांगता घरातून पैसे घेतले. त्यानंतर उत्तर उत्तर प्रदेश हून मिरा भाईंदर येथे आपल्या काकाच्या घरी आला आणि त्यानंतर त्या पैशातून आयफोन घेतला .
त्याच्या वडिलांना जेव्हा घरातून पैसे गायब असल्याचे माहित पडले. तेव्हा त्यांनी याबाबत राजवर्धन याला विचारणा केली.
राजवर्धनने कोणालाही न सांगता घरातून पैसे चोरुन महागडा मोबाईल घेतला होता. वडिलांना हे समजल्याने तो घाबरला होता. या भीतीपोटी त्याने थेट कल्याण गाठले. रात्रीच्या सुमारास पत्रिपुल परिसरात रेल्वे रुळा लगत असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली..
बघ्यांची गर्दी आणि 5 तास वाहतूक कोंडी
कल्याण पत्रीपूल परिसरात झाडाला लटकलेल्या अवस्थेत मुलाला पाहण्यासाठी बघ्यांनी या परिसरात एकच गर्दी केली होती. पत्रीपूलावरुन जाणारी वाहने देखील काय झाले हे पाहण्यासाठी आपला वेग कमी करत होती. तर काही जण वाहने बाजूला लावून काय झाले हे पाहण्यासाठी जात होते.
त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. ही वाहन कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांना तब्बल 5 तास तारेवरची कसरत करावी लागली. रात्रीच्या वेळेला अवजड वाहनही या मार्गावरून जात असल्याने वाहतूक पोलिसांचा चांगलाच घाम निघाला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.