डोंबिवली, ता. 7 - पहाटेपासून पावसाची संततधार आणि त्यात गोविंदा आला रे...आला....गोविंदा रे गोपाला, यशोदेच्या तान्ह्या बाळा आदि घोषणांनी निनादणारा आसमंत...डिजेच्या तालावर पावसाच्या धारा झेलत एकावर एक मानवी मनोऱ्यांची सलामी...
यानंतर यमुनेच्या तिरी काल पाहीला हरी, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा यांसारख्या गितांवर गोविंदांसह साऱ्यांनाच ठेका धरायला लावणारे वातावरण अशा उत्साहपूर्ण वातावरणाने कल्याण डोंबिवली शहर गोविंदामय झाल्याचे पहायला मिळत आहे.
कल्याण डोंबिवली शहरात सर्वच राजकीय पक्षांच्या वतीने दहिहंडी उत्सवाचे आयोजन विविध भागात करण्यात आले आहे. शहरातील बॅनर, कमानी यामुळे राजकीय पक्षांतील चुरस दिसून येत असून गोविंदाचा उत्साह देखील गुरुवारी सकाळपासून दिसून येत होता. गुरुवारी मध्यरात्री 12 वाजताच्या दरम्यान श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
त्यानंतर मानाची हंडी फोडत आयोजकांनी दहिहंडी उत्सवाची रात्रीपासूनच सुरुवात केली. गुरुवारी पहाटेपासून शहरात जोरदार पावसास सुरुवात झाल्याने पाऊस गोविंदाच्या उत्साहावर पाणी फेरतो का अशी शक्यता निर्माण झाली होती. पावसाची संततधार सुरु असूनही आयोजकांसह गोविंदांचा उत्साह काही कमी झालेला दिसून आला नाही.
11 नंतर शहरात वातावरण निर्मिती होण्यास सुरुवात झाली. डोंबिवलीतील बाजी प्रभू चौक, स्टेशन रोड, दिनदयाळ रोड, शिवमंदिर रोड, रामनगर, मानपाडा रोड आदि रस्त्यांवर गोविंदांची मोठ्या प्रमाणात रेलचेल दिसून आली. गोविंदा पथके सकाळीच जेवणाची सोय करुनच छोटे टेम्पो घेऊन निघाले. दहिहंडीच्या ठिकाणी वाहनांची कोंडी होऊ नये म्हणून गोविंदांना ठिकाणापासून काही दूर अंतरावर वाहने उभी करण्याची परवानगी देण्यात आली होती. तसेच विविध भागात वाहतूक पोलिस देखील जातीने लक्ष देऊन उभे होते.
डोंबिवली पूर्वेतील बाजी प्रभू चौकात भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वतीने मोदी नवलाई या दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र तसेच विकासकामांची माहिती देणारे फलक लावत एक वेगळीच वातावरण निर्मिती भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.
तसेच शिवमंदिर रोड येथे शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, रामनगर येथे विष्णू पेडणेकर, डोंबिवली पश्चिमेत भाजपचे माजी नगरसेवक मनिषा व शैलेश धात्रक तसेच शिवसेनेचे युवा सेना सचिव दिपेश म्हात्रे यांच्या वतीने दहिहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मनसेच्या वतीने चार रस्ता येथे बालगोपाळांसाठी विशेष हंडीचे आयोजन करण्यात आले असून बाळगोपाळ बनून आलेल्यांना खास बक्षिसे देण्यात आली.
या मानाच्या मोठ्या हंड्या फोडण्यासाठी कल्याण, डोंबिवलीसह ग्रामीण भागातील गोविंदा पथकांची मोठी रेचलेच डोंबिवलीत यावर्षी दिसून आली. यासोबतच उल्हासनगर, भिवंडी, दिवा, दिघा, भांडूप आदि पसिरतील गोविंदा पथक येऊन पाच, सहा, सात थरांची सलामी देऊन बक्षिस जिंकून जात आहेत.
पावसाने ओलेचिंब गोविंदा
सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक गोविंदा हे पावसात चिंब भिजल्याने थरथरत होते. मात्र त्यातही त्यांचा उत्साह कमी झाल्याचे दिसून येत नव्हते. आयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय व्यवस्था उभी करत गोविंदांना सहकार्य केल्याचे पहायला मिळाले. यामध्ये अनेक लहान लहान गोविंदांचा देखील समावेश यावेळी दिसून आला. पावसात भिजून गोविंदा आजारी पडू नये यासाठी सातत्याने काळजी घेण्याचे आवाहन आयोजकांकडून केले जात होते.
315 हंड्यांचे आयोजन
कल्याण डोंबिवलीत शहर व ग्रामीण भागात सार्वजनिक 52, खासगी 263 अशा एकूण 315 दहिहंड्या दिवसभरात गोविंदा पथक दिवसभरात फोडणार आहेत. त्रासदायक वातावरणही आनंददायी वाटले
रस्त्यावरुन जाताना गोविंदा पथक मोठ्याने आवाज करणे, कर्नकर्कश हॉर्न वाजविणे हे प्रकार करीत होते. तसेच रस्त्याने गोविंदा पथक वाहनांवरुन प्रवास करताना समोरुन दुसरे गोविंदा पथक येताच डफली, टाळांचा आवाज करीत एकमेकांना आवाहनपर प्रोत्साहन दिले जात होते. मात्र त्यांच्या या वर्तणूकीला यंदा कोणी विरोध केला नाही.
हे वातावरण काहीसे त्रासदायक असले तरी हे प्रमाण कमी झाल्याने यामुळे शहरात उत्सव असल्यासारखे वाटते. त्यामुळे थोड्या फार प्रमाणात हा त्रास नाही तर आनंद वाटत असल्याची प्रतिक्रीया अनेक नागरिकांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.