शर्मिला वाळुंज
मुंबई- डोंबिवली एमआयडीसी फेज-२ मध्ये पुन्हा एका कंपनीला आग लागली आहे. त्यामुळे डोंबिवलीतील लोकांनी आपला जीव कधीतरी जाणार असं गृहित धरून जगायचं का? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. डोंबिवली एमआयडीसीमध्ये एका केमिकल कंपनीत स्फोट होऊन अद्याप महिना देखील झाला नाही, तोच दुसऱ्या स्फोटाने डोंबिवलीकरांच्या भीतीमध्ये भर पडली आहे. फेज-२ मधील मालदे आणि इंडो अमाईन्स या दोन कंपन्यांना आग लागली. डोंबिवलीतील नागरिक जीव मुठीत घेऊन जगत आहेत.
प्रत्यक्षदर्शी सुरक्षारक्षक हिरामण तिवारी यांनी सांगितलं की, ''सकाळी साडेनऊच्या सुमारास अचानक कंपनीमध्ये स्फोट झाला. त्यानंतर सगळे कर्मचारी बाहेर पळत आले. कंपनीला आग लागली आणि जवळच्या दुसऱ्या एका कंपनीमध्ये आग पसरली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग इतकी भीषण होती की, सात ते आठ गाड्या आग विझवण्याचे काम करत होत्या.''
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी आग लागली, त्याच्या जवळच अभिनव नावाची शाळा आहे. आगीमध्ये शाळेच्या पार्क केलेल्या तीन स्कूल व्हॅन जळून खाक झाल्या आहेत. शाळा आग लागलेल्या कंपनीपासून हाकेच्या अंतरावर आहे. आग शाळेपर्यंत पसरली असती तर काय? असा प्रश्न स्थानिक आणि शिक्षक विचारत आहेत.
कंपनीला आग लागल्यानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना शाळेतून सोडण्यात आले असं एका शिक्षकाने सांगितले. शाळेच्या जवळच केमिकलच्या कंपन्या असणे किती धोकादायक आहे हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे. अनेक लोकांना धुराचा त्रास होऊ लागला आहे.
डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''काही दिवसांपूर्वी झालेला स्फोट हा महाभयंकर होता. त्यामध्ये मोठी जीवितहानी झाली होती. आता दुसरा स्फोट झाला आहे. यामुळे डोंबिवलीतील नागरिक भयभीत झाले आहेत. माझी सरकार आणि कंपनीच्या मालकांना विनंती आहे, तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. नशीब आज कुठलीही जीवितहानी झालेली नाही.''
पुढे जीवितहानी होऊ नये यासाठी येथील सर्व कंपन्या स्थलांतरित करण्यात याव्यात. माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे विनंती आहे, त्यांनी या कंपन्या लवकरात लवकर हलवाव्यात. तेव्हाच कुठे तरी डोंबिवलीकरांमधील भीती कमी होईल, असं देखील मोरे म्हणाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.