Kokan Latest Update: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या घाटातील दुसरा बोगदा ३ सप्टेंबरपूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणीदरम्यान जाहीर केले होते.
प्रत्यक्षात दुसऱ्या बोगद्याचे काम धीम्या गतीने सुरू आहे. गणेशोत्सवात दुसरा बोगदा वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता धूसर बनली आहे; परंतु राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून ५ सप्टेंबरला काहीही करून बोगद्यातील वाहतूक सुरू केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे फाट्यापासून कशेडी घाटापर्यंतच्या रखडलेल्या कामांसह खड्ड्यात गेलेल्या मार्गामुळे गणेशभक्तांना यंदाही जीवघेणाच प्रवास करावा लागणार होता; मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी या मार्गाची पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. ३ सप्टेंबरपूर्वी महामार्ग सुस्थितीत आणण्याचे निर्देश दिले होते.