Mumbai Local News : निधीअभावी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या ठाणे स्थानकातील पादचारी पुलाच्या कामाला तूर्तास सुरुवात झाली आहे. ठाणे महापालिकेने पुलाच्या कामासाठी चार कोटींचा निधी रेल्वे प्रशासनाकडे सुपूर्द केल्यानंतर बुधवारी मध्यरात्री पुलावर गर्डर टाकण्याचे काम फत्ते झाले; पण हा निधीही अपुरा असून उर्वरित कामे जलद गतीने होण्यासाठी स्मार्ट सिटीअंतर्गत तरतूद करून देण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने ठाणे पालिकेकडे केली आहे
मात्र तशी तरतूद करता येणार नसल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट सांगितल्याने निधीचा तिढा कायम राहणार असून पादचारी पूल पूर्णत्वास येण्यास आणखी काही काळ प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे.
ठाणे रेल्वे स्थानकात असलेले पादचारी पूल प्रवाशांच्या तुलनेत अपुरे पडत आहे. या पादचारी पुलांवरून स्थानकाच्या बाहेर पडताना प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वास्तविक ठाणे रेल्वे स्थानकात यापूर्वी असलेल्या पादचारी पुलांपैकी मुंबई आणि कल्याण दिशेकडील दोन पादचारी पूल ६० वर्षे जुने झाले होते.
त्यामुळे आयआयटीच्या अहवालानुसार ते २०१९ च्या आसपास पाडण्यात आले. त्यामुळे सध्या स्थानकात प्रवाशांना ये-जा करण्यासाठी फक्त पाच पादचारी पूल आहेत. त्यापैकी तीन पादचारी पुलांवर प्रवाशांची सर्वाधिक गर्दी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाडलेल्या पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीची मागणी जोर धरू लागली आहे.
पुनर्बांधणीसाठी पाडलेल्या पादचारी पुलाच्या कामासाठी सन २०१९ मध्ये २७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरुवातीला ८ कोटी रुपये रेल्वेकडे वर्ग करण्यात आले; पण त्यानंतर कोरोना आणि पालिकेच्या आर्थिक स्थितीमुळे निधीअभावी हे काम रखडतच गेले.
आता स्थानकात पुन्हा गर्दी होऊ लागल्याने एल्फिन्स्टनसारख्या घटनेची पुनरावृत्ती ठाण्यात घडू नये म्हणून पादचारी पुलाच्या कामासाठी पालिकेने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी राजन विचारे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली. त्यांनीही याची दखल घेत चार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून पादचारी पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू झाले आहे.
आणखी १५ कोटींची गरज
पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी अजूनही १५ कोटी ६२ लाख ५१ हजार ७१८ रुपये निधीची आवश्यकता आहे. ठाणे महानगरपालिका स्मार्ट सिटीमध्ये समावेश असल्याने या कामाचाही समावेश स्मार्ट सिटीमध्ये करण्यात यावा, असे मध्य रेल्वेने ठाणे महापालिकेस १८ ऑगस्ट २०२३ रोजी पत्राद्वारे कळवले आहे. त्यानुसार निधी वर्ग केल्यास येत्या दोन महिन्यात या पादचारी पुलाचे काम मार्गी लागेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नवीन तरतूद अशक्य
स्मार्ट सिटीअंतर्गत नियोजित प्रकल्पांमध्ये कोणत्याही नवीन कामाचा समावेश करता येत नाही. त्यासाठी निधीही देता येत नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीअंतर्गत रेल्वे प्रशासनाला निधी देणे अशक्य असल्याचे स्मार्ट सिटीचे सीईओ आणि अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी सांगितले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.