मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराची सांगता शनिवारी होत असताना उद्या (शुक्रवारी) महायुतीची शिवाजी पार्क येथे आणि इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसी मैदानावर सांगता सभा होत आहे. महायुतीच्या सभेला भाजपचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत.
तर महाविकास आघाडीच्या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आपचे नेते अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आदी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे मुंबईत उद्या प्रचारतोफा धडाडणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
महायुतीमध्ये सहभागी असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीची सभा आयोजित केली असल्याने या सभेचे यजमानपद ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे असणार आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, अशी आग्रही मागणी या सभेत राज यांच्याकडूनच केली जाणार असल्याची चर्चा आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही गेली अनेक वर्षे मागणी केली जात आहे. इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जाण्याचे आश्वासन काँग्रेसने यापूर्वीच दिले आहे. त्याच पार्श्वभूमीवर, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत मोदी यांच्याकडून राज्याला ठोस आश्वासन देऊन निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मोठी खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे.
टीकेला उत्तर शक्य
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यामध्ये २४ पेक्षा अधिक सभा झाल्या असून शुक्रवारची सभा ही लोकसभा निवडणुकीसाठीची त्यांची मुंबईतील शेवटची सभा असेल. मोदी यांचा कालच (बुधवारी) घाटकोपर येथे रोड शो पार पडला. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर त्याच मतदारसंघात रोड शो झाल्याने विरोधकांनी मोदींवर टीका केली होती.
या टीकेला मोदी या सभेतून उत्तर देण्याची शक्यता आहे. मद्यधोरण प्रकरणात जामिनावर असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘मविआ’च्या सभेला उपस्थित राहावे, यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना गळ घालण्यात आली आहे. तसेच ‘राजद’चे नेते तेजस्वी यादव यांनीही या सभेला उपस्थित राहावे यासाठी त्यांना निमंत्रित केले आहे.
प्रचाराच्या या सांगता सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत. राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवत असून तिथेही २० मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे ते या सभेला उपस्थित नसतील.
याकडे असेल लक्ष
मोठ्या शक्तिप्रदर्शनाची इंडिया आघाडी व महायुतीकडून तयारी
शनिवारी (ता. १८) इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद
पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या भाषणांबाबत उत्सुकता
‘मोदी सरकार चले जाव’ असा नारा इंडिया आघाडीच्या या सभेत दिला जाण्याची शक्यता
अरविंद केजरीवाल यांच्या भाषणाकडे सगळ्यांचे लक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.