बाॅलीवूडचे आवडते चित्रीकरण स्थळ असलेले मढ बेट हे एक जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथे मार्वे बिच, आक्सा बिच, दानापानी बिच, एरंगळ बिच, सिल्वर बिच असे पाच जगप्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. मढ बेट हे सर्वधर्मसमभावाचे केंद्र आहे. जणू तो एक छोटा भारत आहे.
येथे दोन पोर्तुगिजकालीन चर्च आहेत. दोन्ही चर्च १५० वर्षे जुनी आहेत. एरंगळ गाव येथे सेंट बोनाव्हेंचर आणि दर्या माता चर्च मढ येथे आहे. तसेच नवीन वसलेल्या शिवाजीनगर येथे प्रोटेस्टंट समूहाचे सेंट बाप्टिस्ट चर्च २० वर्षांपूर्वी उभारले आहे. दर वर्षी १४ जानेवारीला सेंट बोनाव्हेंचरची जत्रा एरंगळ बिचवर भरते. एरंगळची जत्रा म्हणून ती प्रसिद्ध आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील इतर भागातून ईस्ट इंडियन समाजाचे लाखो जण या जत्रेला येतात. तसेच पूजा करून बिचवर लागलेल्या मेळ्याचा आनंद लुटतात. तसेच या दिवशी येथे विशेष ईस्ट इंडियन पद्धतीने बनवलेले पक्वान्नही उपलब्ध असते. यादरम्यान दहा दिवस सेंट बोनाव्हेंचर नोविना विशेष पूजा होते.
तसेच एरंगळ येथे हिरा देवी, मढ येथे हरबा देवीचे मंदिर, किल्लेश्वर हे शंकराचे मंदिर १५० वर्षांहून अधिक जुने आहे. महाशिवरात्री आणि होळीउत्सव हे या मंदिराचे विशेष उत्सव आहेत. नारळी पौर्णिमा हा कोळी समाजाचा विशेष सोहळा असतो. पारंपरिक पोशाखात महिला आणि पुरुष सण साजरा करतात. तसेच व्यापारासाठी व कामासाठी आलेले मुस्लिम समाजाचेही अनेक जण इथे स्थायिक झालेले आहेत. त्यांची येथे मशीद आहे.
अंबू बेट
इथे जवळच अंबू बेट आहे. मढवरून बोटींने तेथे जावे लागते. तेथे अंबुवा देवीचे मंदिर आहे. तसेच येथे मुस्लिम सुफी संत हजरत निजामुद्दिन हुसेनी शाह बाबा यांचा दर्गा (मजार) आहे. तसेच ख्रिस्ती समाजाचे चॅपलही आहे. येथे जाण्यासाठी मढ किनाऱ्यावरून बोटीने जावे लागते. सकाळी ७ ते संध्याकाळी ५ च्या दरम्यान पर्यटक ये-जा करू शकतात. साधारणपणे गुरुवारी अधिक पर्यटक मुंबई व इतर ठिकाणाहून येथे येतात. तसेच फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात येथे एकदिवसीय उरूस म्हणजे जत्रा असते.
कसे जाल?
मालाड स्टेशनहून बेस्ट बस २७१ ही मढ जेट्टीपर्यंत जाते. तेथून बोटीने जावे लागते.
बोरिवलीहून बेस्ट बस २६९ मढ जेट्टीपर्यंत जाते. तेथून बोटीने जावे लागते.
अंधेरीहून वर्सोव्याला जाऊन बोटीने जाता येते.
मालाड स्टेशनपासून सहा किमी मार्वे बीच, १४ किमी मढ, आठ किमी आक्सा, नऊ किमी दानापानी, ११ किमी एरंगळ व पुढे मढ सिल्वर बीच आहे.
ईस्ट इंडियन, कोळी समाज अधिक
येथे अधिकतर ईस्ट इंडियन आणि आगरी कोळी समाजातील लोक वास्तव्य करत आहेत. तसेच कालांतराने नवीन वस्त्याही अस्तित्वात आल्या आहेत. यात बोटींवर काम करणारे खलाशी, मजूर, तसेच भारतभरातून आलेले अनेक जण येथे राहत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.