डोंबिवली - कल्याण ग्रामीण मधील मलंगगड परिसरात केंद्र सरकारच्यावतीने जलजीवन मिशन या योजनेंतर्गत घराघरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. पहिल्यांदाच या भागातील घरांना नळाद्वारे पाणी मिळणार असून या कामाचे भूमिपूजन शनिवारी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी कल्याण पूर्वचे आमदार यांनी ग्रामीण भागातील विकासकामांवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. वरती जसे आपण काम करतो, तसे स्थानिक पातळीवर देखील भाजपा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केले पाहीजे.
वरती युती झाली तशीच खाली देखील कार्यकर्त्यांमध्ये युती झाली पाहीजे असे सांगितले. यावर खासदार डॉ. शिंदे यांनी त्यांच्या शैलीत उत्तर देत सांगितले की वरती युती झाली आहे, खाली ही युती झालेली आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी डोक्यात शंका ठेवू नका.
मलंगगड परिसरातील ग्रामीण भागात पहिल्यांदाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही या भागात घरोघरी नळाद्वारे पाणी पुरवलं जात नव्हतं. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ग्रामीण भागात पाणी पुरवठा हा केला जाणार असून शनिवारी खासदार डॉ. शिंदे यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झाले.
यावेळी आमदार गणपत गायकवाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, महेश गायकवाड, राजेश मोरे, महेश पाटील यांसह शिवसेना भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खासदार शिंदे म्हणाले, मलंगगड परिसरात 66 कोटींची कामं करण्यात येणार आहेत.
यामध्ये मलंगगड परिसरातील सर्व 56 गावांमध्ये नळजोडण्या देण्यात येणार असून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पुरवठा केला जाणार आहे. भूमिपूजन झाल्यानंतर उद्यापासून लगेचच या कामाला सुरुवात होईल आणि वर्षभरात प्रत्येक घरात नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू होईल, असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी व्यक्त केला.
याचं कार्यक्रमानंतर खा. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि सांगितले की महाविकास आघाडीची वज्रमुठ राहते की नाही? हे लवकरच कळेल. महाविकास आघाडीचे नेते दररोज जी वज्रमूठ दाखवण्याचा प्रयत्न करतायत, ते फक्त स्वतःच्या समाधानासाठी आणि लोकांना दाखवण्यासाठी सुरू आहे. आधी ते आमच्यावर टिका टिप्पणी करत होते, आता एकमेकांवर करायला लागले आहेत.
मात्र दुसरीकडे लोकांच्या मनातलं सरकार सध्या आलं असून गेल्या दहा महिन्यात वेगवान निर्णय आणि वेगवेगळ्या पॉलिसी आणण्याचं काम या सरकारने केलंय. गेल्या अडीच वर्षातलं सरकार मात्र सुस्त होतं आणि गेल्या अडीच वर्षात काहीच काम झालं नव्हतं. तेच काम आम्ही गेल्या दहा महिन्यात करून दाखवलं.
म्हणूनच लोकांसमोर जाताना महाविकास आघाडीची एकी कशी दाखवता येईल? हे शोकेस केलं जातं. मात्र आता येणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभा रद्द केल्या असून त्यामुळे ही वज्रमूठ राहते की नाही? हे आपणही पहा, लोकही पाहत आहेत, असं खासदार शिंदे म्हणाले.अजित दादा तुमच्याकडे येणार आहेत का? असं त्यांना विचारलं असता, मी एक छोटा कार्यकर्ता असून तो त्यांचा अंतर्गत विषय आहे, यामध्ये मी जास्त बोलू शकत नाही.
अजितदादा इकडे जातात, तिकडे जातात, अशा बातम्या मीडियावर दाखवत असून अजित दादांना तरी सांगू द्या ते कुठे जातायत, असं म्हणत त्यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं. तर त्याचवेळी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी मात्र आमच्याकडे कोणीही आलं तरी स्वागतच आहे, असं म्हटलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.