डोंबिवली : जून महिना संपत आला तरी डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी मधील नाले, गटारे यांची सफाई झाली नसल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत. निवासी भागातील मोठ्या नाल्यांची केडीएमसी कडून तर अंतर्गत छोट्या गटारांची सफाई एमआयडीसी कडून करण्यात येते. नाले, गटारांत आज ही मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. पाऊस तोंडावर आला तरी प्रशासन कामात संथ चालत असल्याने येथील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
एमआयडीसी निवासी आणि औद्योगिक भागातील काही मोठे नाल्यांची सफाई अद्याप झाली नसल्याचे तर काही मोठे नाले यांची वरवरचा कचरा काढून दिखाऊ नाले सफाई केली असल्याची बाब स्थानिक रहिवासी राजू नलावडे यांनी निदर्शनास आणले आहे. डीएनएस बँक मुख्य शाखा ते अभिनव विद्यालय कडे जाणारा नाला,
एमआयडीसी सर्व्हिस रोड/कल्याण शिळ रोड मधून जाणारा नाला, उस्मा पेट्रोल जवळून जाणारा नाला असे अनेक औद्योगिक आणि निवासी भागातील नाले यांची साफसफाई झालीच नसल्याचे एकंदर पाहणीत आढळून आले आहे. एमआयडीसी निवासी मधील मध्यवर्ती असा कावेरी नाल्यांची साफसफाई करण्यात आली पण तीही नीट करण्यात आली नाही. हाच नाला पुढे आजदे गावात काही अनधिकृत बांधकामांमुळे अगदीच छोटा होऊन गेला आहे. याच नाल्याची व इतर नाल्यांची मे महिन्याचा सुरवातीला पूर्वपाहणी स्थानिक आमदार राजु पाटील यांनी केली होती.
तेव्हा केडीएमसी आणि एमआयडीसी अधिकाऱ्यांना स्थानिक रहिवाशांनी आणि आमदारांनी फैलावर घेऊन जाब विचारला होता. तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांनी नाले सफाईची कामे मे महिना अखेरपर्यंत पूर्ण होतील अशी आश्वासने दिली गेली होती असे नलावडे सांगतात.
एमआयडीसी मधील छोटी पावसाळी गटारे ही एमआयडीसी कडून साफ करण्यात येतात. मागील वर्षी काही गटारे नवीन बनविण्यात आली होती. सदर ती गटारे एमआयडीसी कडून अर्धवट, चुकीचा पद्धतीने बांधण्यात आली आहेत. जी जुनी गटारे आहेत ती काही ठिकाणी तुटलेली, बुजलेली आहेत. मिलापनगर, सुदर्शननगर, सुदामानगर, चैतन्यनगर या निवासी मधील भागात या पावसाळी गटारांचे पाणी वाहून जाताना अनेक मोठ्या समस्या निर्माण होणार आहेत असे ते सांगतात.
नाले, गटारी साफसफाईची कंत्राट घेणारे ठेकेदार हे राजकीय समर्थक असतात. ते अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून त्यातून मोठा आर्थिक फायदा करून घेत आहेत. हे ठेकेदार करोडो रुपयांची बिले थातूरमातूर नाले साफसफाई करून घेत असतात. हे जनतेचे म्हणजेच आपले पैसे आहेत. कल्याण डोंबिवली मधील नाले सफाईची सखोल चौकशी एखाद्या तटस्थ तपास यंत्रणेने केली तर त्यातून बऱ्याच धक्कादायक गोष्टी बाहेर येतील असा आरोप देखील नलावडे यांनी केला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.