करुन तर पहा, म्हणे भगवा उतरविणार; सामनातून भाजपला खडेबोल

करुन तर पहा, म्हणे भगवा उतरविणार; सामनातून भाजपला खडेबोल
Updated on

मुंबईः आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवरुन आता राजकारणात चढाओढ सुरु झाली आहे. यावरुनच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेवर  फक्त भाजपचा भगवा झेंडा फडकणार असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्यावर शिवसेनेनं आता भाजपला थेट आव्हान केलं आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल अशा शब्दात शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. 

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात

  • मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल. मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेज आहे. भूगर्भामध्ये प्रचंड खळबळ माजून पृथ्वीच्या तप्त अंतःकरणाचे कढ बाहेर आले आणि शांत झाले. त्यातूनच सह्याद्रीचा जन्म झाला. त्याच खळबळीत मुंबईचा जन्म झाला. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा ‘युनियन जॅक’ फडकविण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये.
  • मुंबई जिंकण्याचा चंग भारतीय जनता पक्षाने बांधला आहे. भारतीय जनता पक्षाने असे ठरवले आहे की, या वेळी मुंबई महानगरपालिकेवर शुद्ध भगवा फडकवायचा. आता हा शुद्ध भगवा म्हणजे नक्की काय प्रकार आहे? बेशुद्ध अवस्थेत केलेले हे विधान आहे. बिहारच्या निवडणुका भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आहेत, पण त्या जिंकताना त्यांचा कसा दम निघाला ते देशाने पाहिले. बिहार निवडणुकीचे प्रभारी आपले देवेंद्र फडणवीस होते. त्यामुळे विजयाचे श्रेय मोदींइतकेच फडणवीस यांच्याकडेही जाते. प्रश्न इतकाच आहे की, बिहारच्या विजयाने भाजपचा नक्की कोणता झेंडा पाटण्यावर फडकला आहे? विचारांचा झेंडा एकच असतो. त्यात भेसळ असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. बिहारवर भगवा फडकवू किंवा भगवा फडकला असे विधान भाजप पुढाऱ्यांकडून झाल्याचे स्मरत नाही. कारण त्यांचा तसा भगव्याशी संबंध नाही. शिवसेनेशी युती झाल्यापासून त्यांचा भगव्याशी संबंध आला.  
  • भाजप शिवसेनेसोबत नव्हता तेव्हापासून मुंबईवर भगवा फडकलेलाच आहे. हा भगवा शुद्ध, तेजस्वी आणि प्रभावी आहे. यापेक्षा वेगळा भगवा अस्तित्वात आहे असे महाराष्ट्राला वाटत नाही. हा भगवा छत्रपती शिवरायांचाच आहे. आता भाजपमध्ये कुणी प्रतिशिवाजी निर्माण झाले असतील व त्यांनी त्यांचा स्वतंत्र भगवा निर्माण केला असेल तर तो त्यांचा प्रश्न. शिवरायांचे सातारा व कोल्हापूरच्या गादीचे वंशज भाजपमध्ये सामील करून घेतले आहेत, पण भगव्याची मालकी मराठी शिवरायांच्या प्रजेकडे म्हणजे मराठी जनांकडेच आहे. तोच भगवा मुंबईवर पन्नास वर्षांपासून फडकत आहे. हा भगवा उतरवून वेगळा झेंडा फडकवणे ही
  • महाराष्ट्राशी आणि छत्रपती शिवरायांशी प्रतारणा आहे. मुंबई महापालिकेवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे म्हणजे महाराष्ट्राचा मुंबईवरील हक्क नाकारण्यासारखेच आहे. मुंबई महापालिकेवरील भगव्यास हात घालू असे सांगणे म्हणजे मराठी माणसांचे मुंबईशी नाते तोडण्यासारखेच आहे. भगवा उतरविणे म्हणजे मुंबई पुन्हा भांडवलदारांच्या घशात घालून मराठी माणूस, श्रमिक, मजुरांना गुलाम करण्यासारखेच आहे. मुंबईवरील भगवा उतरविण्याची भाषा करणे ही 105 मराठी हुतात्म्यांशी सरळ सरळ बेइमानी आहे. छत्रपती शिवरायांचा त्याग, त्यांचे हजारो, लाखो मावळे, महाराष्ट्र घडवताना कामी आलेल्या मर्द मराठय़ांच्या रक्ताचे शिंपण या भगव्यावर झाले आहे. दिल्लीच्या अजगरी जबडय़ातून मुंबईची सुटका करण्यासाठी मराठी माणसे गोळय़ा, लाठय़ांची पर्वा न करता रस्त्यावर उतरली. त्यांच्या रक्ताच्या तेजाने हाच भगवा सूर्यतेजाला आव्हान देत असतो. हा मराठी अस्मितेचा, हिंदू तेजाचा अस्सल भगवा उतरविण्याचे कपट-कारस्थान जे करीत आहेत ते देशातील प्रखर हिंदुत्वाचा अपमान करीत आहेत. त्यांना मुंबई महापालिकेवरील भगवा राजकीय स्वार्थासाठी उतरवायचा आहे. धन्य धन्य त्या दळभद्री विचारांची!
  • महाराष्ट्राच्या मातीतून हे असे कोळसे निपजावेत व भगव्यास कलंक लागावा यासारखे दुर्दैव ते कोणते! भगवा हा जगभरात एकच आहे, तो म्हणजे शिवरायांचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचाच! मुंबई महापालिकेवरील भगव्याची चिंता ज्यांना वाटत आहे ते सगळे बेगडी नरवीर बेळगावच्या महानगरपालिकेवरील भगवा भाजपच्याच नतद्रष्टांनी उतरविला तेव्हा कोणत्या बिळात लपले होते? बेळगाव महापालिकेवरील भगवा शुद्ध, स्वाभिमानी नव्हता काय? बेळगावात मराठी माणसांना रस्त्यावर तुडवले जाते, त्यांच्या खांद्यावरील भगवा
  • कानडी सरकार पायाखाली चिरडून मुरडून टाकते तेव्हा त्या आक्रोश करणाऱ्या भगव्यासाठी यांचे मन का गर्जना करीत नाही? बेळगावच्या मराठी माणसाच्या हाती जो भगवा आहे तोच भगवा मुंबई महापालिकेवर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे प्रतीक म्हणून फडकतोय. हा भगवा कोणाला उतरवायचा आहे काय? मुंबई महापालिका ही मराठी अभिमान, स्वाभिमानाचे प्रतीक आहे. जोपर्यंत पालिकेवर भगवा आहे तोपर्यंत महाराष्ट्र दुश्मनांचे पाशवी हात मुंबईच्या गळय़ापर्यंत पोहोचणार नाहीत. मुंबई भांडवलदारांची बटीक होण्यापासून रोखण्याचे काम याच तेजस्वी भगव्याने केले आहे. 
  • मुंबईवरील भगवा उतरविण्याचे स्वप्न ज्यांनी पाहिले ते राजकारण आणि सार्वजनिक जीवनातून कायमचे नेस्तनाबूत झाले. बाळा नातू व चिंतू पटवर्धन या पेशव्यांनी लाल महालावरील भगवा खाली खेचून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकवला. भगवा खाली उतरविताना त्या मंडळींच्या चेहऱयावर एक प्रकारचा आसुरी आनंद दिसत होता. भगवा उतरताना पाहून समस्त पुणेकर, देश दुःखाने खाली मान घालून चरफडत होते, पण काही मंडळी अत्यानंदाने बेहोश झाली. त्या बेहोश मंडळींच्या वारसदारांना मुंबई महापालिकेवरील भगवा उतरवण्याची अवदसा आठवली असेल तर त्या अवदसेचे थडगे मुंबईची तमाम जनता बांधून त्यावरही भगवा फडकवेल.
  • मुंबई महापालिकेवरील भगवा हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे तेज आहे. भूगर्भामध्ये प्रचंड खळबळ माजून पृथ्वीच्या तप्त अंतःकरणाचे कढ बाहेर आले आणि शांत झाले. त्यातूनच सह्याद्रीचा जन्म झाला. त्याच खळबळीत मुंबईचा जन्म झाला. मुंबई म्हणजे सदैव उसळणारा अग्नी आहे. या अग्नीचा रंग भगवा आहे. भगवा शुद्धच आहे. भगव्याला हात लावाल तर जळून खाक व्हाल. इतिहासाच्या पानोपानी याचे दाखले आहेत. मुंबई महापालिकेवर नव्या ईस्ट इंडिया कंपनीचा ‘युनियन जॅक’ फडकविण्याची भाषा करणाऱ्यांनी हे विसरू नये.

-------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

mumbai municipal corporation election shivsena Saamana editioral criticized bjp devendra fadnavis

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.