मुंबई - हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई महापालिकेचा आता आटापिटा सुरू झाला आहे. प्रशासनाने विविध स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. हवेतील गुणवत्ता सुधारण्यासाठी ६५० कोटी रुपये खर्च पालिका खर्च करणार आहे. धुळीचे प्रमाण कमी करणे व त्यासाठी मुंबई शहर आणि उपनगरात पाणी शिंपडण्यासाठी यांत्रिकी झाडू खरेदी, वाहतुकीसाठी ई-बसेस खरेदी करणे तसेच बॅटरी चार्जिंग स्टेशन सुरू करणे आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
मुंबईतील हवेचा स्तर खालावला जात असल्याने मुंबईकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेच्या उपाययोजना सुरू आहेत. मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे दमा, श्वसनाच्या विकारात वाढ झाली आहे. मुंबईतील हवेचा स्तर उंचावण्यासाठी पालिकेनेही अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ व महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणि पाठविलेल्या नमुन्याप्रमाणे मुंबईतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी महापालिकेने हवेचा कृती आराखडा तयार केला आहे.
शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण करणे, अडथळे दूर करून वाहतूक कोंडी कमी करणे, वाहतूक शिस्तबद्ध करणे, अत्याधुनिक वाहतूक प्रणाली विकसित करणे, वांद्रे-कुर्ला संकुल, लोअर परळ आदी विभागातील वाहनांद्वारे उत्सर्जित होणारे हवा प्रदूषण कमी करणे, ध्वनी प्रदूषण नियंत्रित करणे या उपाययोजनांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनान दिली आहे.
पालिकेसाठी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाकडून पंधराव्या वित्त आयोगांतर्गत पालिकेला हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सुमारे ३३० कोटी अनुदान दिले आहे. तसेच पाण्याचे संरक्षण, पुरवठा, व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापनासाठी सुमारे ३२४ कोटी असे एकूण ६५४ कोटी रुपये देण्यात आले आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हा निधी खर्च करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
अशा होणार उपायोजना
- पाणी शिंपडण्यासाठी यांत्रिकी झाडूची करणार खरेदी
- कचऱ्याचे ऊर्जेत रूपांतरण करणार
-वाहतुकीसाठी ई-बसेस खरेदी करणे
- बॅटरी चार्जिंग स्टेशन सुरू करणार
- हरित पट्ट्याची वाढ व सुधारणा केली जाणार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.