डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील डाॅ. नानासाहेब धर्माधिकारी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम पूर्ण देखील झाले नाही तोच नवा कोरा रस्ता खोदण्याची वेळ आली आहे.
रासायनिक वाहिनीची गळती झाल्याने हा रस्ता शुक्रवारी सकाळी खोदण्यात आला आहे. एमआयडीसी निवासी भागात हा रस्ता असून रासायनिक पाण्याच्या वाहिन्या बाजूला आहेत. त्यामुळे रस्त्याचे काम करताना बाजूला स्वतंत्र सेवा वाहिनी मार्गिका तयार करण्यात यायला हवी ती न केल्याने ही वेळ आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
एमआयडीसी निवासी भागातील शिवशाही मित्र मंडळ कार्यालयासमोरील सिमेंट काँक्रीटचा नविन रस्ता शुक्रवारी सकाळी जेसीबीच्या साहाय्याने तोडण्यात आला. ‘एमएमआरडीए’कडून अतिशय संथगतीने हे काँक्रीटचे काम सुरू आहे.
या संथगती कामांमुळे उद्योजक, रहिवासी, पादचारी हैराण आहेत. अचानक रस्ता खोदकाम सुरू करण्यात आल्याने परिसरातील रहिवासी, जागरुक नागरिकांनी त्यास विरोध केला. नवीन रस्ता का तोडण्यात येत आहे, असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले.
या रस्त्याखालून सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून येणारी एक रासायनिक सांडपाणी वाहिनी सिमेंट रस्त्याच्या दबावामुळे तुटली आहे. त्यामुळे रासायनिक पाण्याची गळती सुरु झाली आहे. ही गळती थांबविणे गरजेचे असून ती रस्ते खराब होण्यास कारणीभूत ठरु शकते अशी शक्यता एका अधिकाऱ्याने वर्तविली आहे. त्यामुळे रस्ता खोदून त्वरीत वाहीनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
एमआयडीसीत काँक्रीट रस्ते बांधण्यापूर्वी या भागातील जलवाहिन्या, महावितरण, दूरसंचार, महानगर गॅस अशा सेवा वाहिन्यांसाठी रस्त्यांच्या बाजुला स्वतंत्र सेवा वाहिनी मार्गिका तयार करण्यात यावी. जेणेकरुन या भागात नवीन सेवा वाहिन्या टाकायच्या असतील, त्या स्थलांतरित करायच्या असतील तर त्यासाठी रस्ता खोदकाम न करता ही कामे प्राधान्याने करता येतील.
तसेच काँक्रीट रस्त्याखाली 100 मीटरवर सेवा वाहिन्यांसाठी मोकळी मार्गिका ठेवण्याची मागणी रहिवाशांकडून करण्यात आली होती. मात्र या मागण्यांना कंत्राटदाराने वाटाण्याच्या अक्षता दाखविल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणने आहे.
पावसाळा तोंडावर आला असून या रस्त्याचे अर्धे काम देखील पूर्ण झालेले नाही. तसेच एमआयडीसीत नियमित विविध प्रकारची सेवा वाहिन्या टाकणे, स्थलांतरित करण्याची कामे नियमित केली जाणार आहेत. अशा प्रत्येक वेळी रस्ते खोदून कामे करण्यात येत असतील तर केलेल्या कामाचा खर्च, श्रम वाया जाणार आहेत. कामाची गती वाढवली नाही तर पावसाळ्यात नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.