डोंबिवली - बदलापूर महामार्गावरील वसार गावाजवळील एक मार्गिका गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. दुसरी चालू मार्गिका अरुंद असल्याने रस्त्यावर या ठिकाणी प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. एमआयडीसी आणि शेतकरी यांच्यात रस्त्याच्या भूसंपादनाचा वाद असून त्यावर तोडगा निघत नसल्याने शेतकऱ्यांनी एक मार्गिका बंद केली आहे.
रस्ता बंद करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी जमिन कसण्याचा निर्णय घेत चक्क डांबराच्या रस्त्यावर माती टाकून भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली आहे. महिनाभर मार्गिका बंद असूनही प्रशासन काहीच भूमिका घेत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील वसार गावात एमआयडीसीने पाईपलाईन टाकण्यासाठी भूसंपादन केले असून यामध्ये तफावत आढळून आली आहे. हक्काच्या जागेसाठी वसार गावातील स्थानिक शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत.
एमआयडीसी प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर येथील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत पोलिस प्रशासन, एमआयडीसी अधिकारी यांच्याशी चर्चा करत महिनाभरापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांच्या जागेतील बदलापूर पाईपलाईन महामार्गावरील नेवाळी नाका मार्गे जाणारी मार्गिका ही बंद केली आहे.
यावर तोडगा काढण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला होता. याला आता महिना उलटला तरी प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी त्यांची जमीन कसण्याचा निर्णय घेतला आहे. डांबरच्या रस्त्यावर माती टाकत शेतकऱ्यांनी त्यात भोपळा, कोथिंबीर, आळू ची लागवड केली आहे. यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांचे ही शेती सध्या लक्ष वेधून घेत आहे.
शेतकरी आणि एमआयडीसी प्रशासन यांच्यातील वादाचा त्रास सर्वसामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे. महामार्गावरील एक मार्गिका ही बंद असल्याने दुसऱ्या मार्गावर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ठाणे, कल्याण दिशेकडून येणाऱ्या वाहनांना अंबरनाथ, बदलापूर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा लागतो.
बदलापूर एमआयडीसीकडे जाणारा हा मुख्य रस्ता असून या मार्गावर जड अवजड वाहनांची वर्दळ असते. वसार गावाजवळ अरुंद मार्गावरुन वाहतूक सुरु असून ट्रक, कंटेनरचे ट्रक, टॅंकर अशी मोठी वाहने आल्यास कोंडी होत आहे. 30 मीटरचा रस्ता हा बंद करण्यात आला असून त्यापुढे नेवाळी नाका मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर वळण घेताना ही मोठी वाहने अडकत आहेत.
त्यामुळे या वाहनांच्या पाठी इतर वाहनांच्या रांगाच रांगा लागतात. दुचाकीस्वार आपल्या दुचाकी जागा मिळेल तशा या ठिकाणाहून मार्गक्रमण करत असल्याने त्यांच्यामुळे या कोंडीत भर पडते. या वाहनांच्या कोंडीत रुग्णवाहिका अडकत असल्याने रुग्णांचे देखील हाल होत आहेत. यामुळे या समस्येवर लवकर तोडगा निघावा अशी अपेक्षा वाहन चालक करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.