Mumbai News : शासनाने ‘खड्डे आपल्या दारी’ उपक्रम सुरू करावा: मनसेची जोरदार टीका

Mumbai News
Mumbai News
Updated on

डोंबिवली - पहिल्याच पावसात कल्याण डोंबिवली व ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होऊन रस्त्यांवर मोठं मोठे खड्डे पडले आहेत. दरवर्षी शहरातील रस्त्यांची पावसाळ्यात ही अवस्था असून रस्त्यावर पडणारे खड्डे आणि त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल विचारात घेऊन शासनाने आता ‘खड्डे आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करावा.

या उपक्रमामुळे किमान शासन अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर रहिवासी कसे प्रवास करतात याची जाणीव होईल. हे खड्डे किमान वेळीच बुजविले जावे, अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी केली आहे.

Mumbai News
Mumbai Metro : मागाठाणे मेट्रो स्थानकाबाहेर भराव टाकण्याचे काम सुरू; बंद मार्ग लवकर सुरु करण्याचा प्रयत्न

पावसाळा सुरू झाला आहे, एकीकडे कल्याण-डोंबिवलीत अनेक ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरणचे काम सुरू आहे. या कामामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असून दुसरीकडे पहिल्याच पावसात शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत.

डोंबिवली पूर्वेतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालया समोरील सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येतो म्हणून त्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात कल्याण डोंबिवली पालिका टाळाटाळ करत असेल तर ते गंभीर आहे, असे घरत यांनी म्हटले आहे.

राज्यातील सत्ताधीश सत्ता टिकविणे आणि मंत्रीपद मिळते की नाही यामध्ये व्यस्त आहेत. त्यांना स्थानिक पातळीवर काय चालले आहे याची जाणीव नाही. शासनाने मोठा गवगवा करुन नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू करुन नागरिकांचा भ्रमनिरास केला आहे. त्याऐवजी ‘खड्डे आपल्या दारी’ हा उपक्रम शासनाने हाती घ्यावा.

प्रत्येक शहरांमधील कार्यक्रम निश्चित करुन तेथे पालिका, शासन, एमआयडीसी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी बोलवावेत. त्यांच्या समोरच रस्ता कोणाच्या अखत्यारित आहे याची खात्री करुन त्या कार्यक्रमातच त्या शहरातील खड्डे तात्काळ बुजविले जातील, अशी व्यवस्था शासनाने उभी करावी, अशी मागणी घरत यांनी केली.

Mumbai News
Sharad Pawar : आता थांबा, तुमच्या राजकारणामुळेच शेतकऱ्यांचा गेम झालाय; हर्षवर्धन जाधवांची टीका

पेंढरकर महाविद्यालया समोरील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित आहे. या खात्याचे मंत्री डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत. आपण ज्या शहराचे नेतृत्व करतो. जे खाते सांभाळतो त्याच रस्त्याची डोंबिवलीत दुरवस्था झाली असेल आणि मंत्री म्हणून चव्हाण याविषयी काही करू शकत नसतील, तर त्यांना मंत्री पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. नवीन आयात ताफ्यातील एखाद्या आमदाराला सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्रीपद द्यावे, अशी मागणी घरत यांनी केली.

विकासाच्या आघाडीवर डोंबिवली शहर पूर्ण अपयशी ठरले आहे. शहरातील फेरीवाले कायम आहेत. जागोजागी कचऱ्याचे ढीग, बेकायदा बांधकामांचा सुळसुळाट, त्याच्यावर पालिका प्रशासनाचे नियंत्रण नाही. गलिच्छ, घाणेरडे अशी बिरुदे डोंबिवलीसाठी वापरली जात आहेत हे गंभीर आहे, असे घरत म्हणाले.

कल्याण डोंबिवली शहरांचा काय राज्याचा चेहरा बदलायचा असेल तर पाच वर्ष फक्त मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हातात राज्याची सत्ता द्या मग पहा विकास कसा असतो ते आम्ही दाखवून देऊ, असा विश्वास घरत यांनी व्यक्त केला. मनसे म्हणून आमची काम करण्याची एक पध्दत आहे. जनतेने आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन घरत यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.