हार्बर लोकल विरारपर्यंत?

हार्बर लोकल विरारपर्यंत?
Updated on

मुंबई - उपगरीय मार्गावर प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याने लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी होत आहे. त्यावर पर्याय म्हणून हार्बरचा सीएसएमटी ते अंधेरी लोकलचा विस्तार गोरेगावपर्यंत होणार आहे. मात्र तो गोरेगावपर्यंत मर्यादित न ठेवता गोरेगाव ते बोरिवली आणि बोरिवली ते विरार असा करण्याची योजना सुरू आहे. त्याबाबत मुंबई रेल विकास कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे चर्चा सुरू आहे. सीएसएमटी ते विरारपर्यंत हार्बरचा विस्तार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून लवकरच तो रेल्वे बोर्डाकडे सादर केला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उपनगरीय प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणारा वांद्रे ते विरार उन्नत मार्ग (एलिव्हिटेड प्रकल्प) विविध कारणांनी रेल्वेला गुंडाळावा लागला. त्या जागी हार्बरचा विस्तार गोरेगाव ते बोरिवली आणि बोरिवली ते विरार अशा दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. त्यासाठी दोन नवीन मार्गिका तयार कराव्या लागणार असून त्याबाबतचा अंतिम अहवाल तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पश्‍चिम रेल्वेवरील सर्वाधिक प्रवाशांची संख्या अंधेरी ते विरार पट्ट्यात आहे. हार्बरचा विस्तार थेट विरारपर्यंत झाल्यास पश्‍चिम रेल्वेवरील प्रवाशांचा भार कमी होणार आहे. सीएसएमटीहून थेट विरारला जाता येणार असल्यामुळे प्रवाशांचा प्रवासही जलद व सुकर होणार आहे.   

पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर त्यांचा विस्तार बोरिवली ते विरारपर्यंत करण्यात येईल. बोरिवली ते विरारपर्यंत चार मार्ग उपलब्ध असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्यांचा ताण तिसऱ्या व चौथ्या मार्गावर पडतो. त्यामुळे बोरिवली ते विरारपर्यंत प्रवास सुकर होण्यासाठी पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले. 

दिवा-पनवेल प्रकल्पही 
वसई-विरार आणि दिवा-पनवेल प्रकल्पही लवकरच सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. हा प्रस्तावित मार्ग मध्य रेल्वेच्या पनवेल-दिवा-वसई रोड आणि पश्‍चिम रेल्वेच्या वसई रोड ते विरारपर्यंत समांतर असेल. मेगा प्रकल्पाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असून २०२३ पर्यंत त्याचे काम पूर्ण करण्याचे आव्हान रेल्वे प्रशासनासमोर असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.