मुंबई - मुंबईतील फोर्ट येथील काळा घोडा परिसरातील चौकाला इस्राईलचे पंतप्रधान दिवंगत शिमॉन पेरेस यांचे नाव देण्याचा प्रस्ताव गुरुवारी पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत राखून ठेवण्यात आला. या बैठकीत या प्रस्तावावरून समाजवादी पक्ष आणि भाजपच्या सदस्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. या चौकाच्या नामकरणाच्या फलकाचे गुरुवारी (ता. 18) अनावरण करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता.
काळा घोडा परिसरातील चौकाला पेरेस यांचे नाव द्यावे, असे पत्र फेडरेशन ऑफ इंडो इस्राईल चेंबर्स ऑफ कॉमर्सने महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी या नामकरणाचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. मुंबईसह देशभरात इस्राईली नागरिक राहत असल्याने या चौकाला पेरेस यांचे नाव देण्यास हरकत नाही, असा दावा भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी या वेळी केला.
'भारताच्याच काय मुंबईच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक; तसेच राजकीय क्षेत्रात पेरेस यांचे कुठलेही योगदान नाही. त्यामुळे त्यांचे नाव चौकाला देणे योग्य नाही. हे नामकरण झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल,'' असा इशारा समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी दिला. त्यामुळे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी हा प्रस्ताव राखून ठेवला.
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आई-वडील गमावलेला मोशे होल्टझबर्ग हा मुलगाही त्यांच्या सोबत मुंबईत आला आहे. नेतान्याहू गुरुवारी मुंबईत आले. त्यांच्या उपस्थितीत या चौकाच्या नामफलकाचे अनावरण करण्याचा पालिका प्रशासनाचा प्रयत्न होता.
|