मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई उपनगरात अनेक मेट्रो प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. याचपार्श्वभूमीवर, वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ मार्गिकचे काम वेगात सुरु आहे. नुकतीच या मेट्रो मार्गिकेसाठी मोघरपाडा येथे कारडेपोच्या बांधणीला मंजुरी देण्यात आली.
या मार्गिकेच्या बांधणीत घोडबंदर येथे प्रचंड वाहतूक कोंडी असणाऱ्या भागात वाहतुकीत अढथळा न आणता मेट्रो खांबांवर चार पिअर कॅप बसविण्यात एमएमआरडीएला यश मिळाले आहे. विशेष म्हणजे २४ तासांत एमएमआरडीएने ही उभारणी यशस्वीपणे केली आहे.
मेट्रो ४ ही मुंबईतील सर्वात लांब मेट्रो आहे आणि ती ३२ किमीपेक्षा जास्त लांब आहे. अनेक भागात प्रचंड रहदारी आणि असंख्य आव्हाने असलेल्या मुंबईसारख्या शहरात मेट्रो प्रणाली विकसित करणे हे एमएमआरडीएसाठी आव्हानात्मक काम आहे.
मेट्रोच्या बांधकाम प्रक्रियेदरम्यान पिअर कॅप्स, यू-गर्डर आणि आय-गर्डर यांसारख्या अवजड प्रीकास्ट (पुर्वनिर्मित) घटकांच्या कास्टिंग आणि उभारणीवर मुख्य लक्ष केंद्रित केले जाते. हे प्रीकास्ट घटक वेगवेगळ्या कास्टिंग यार्ड्सवर तयार करून बांधकाम स्थानावर नेले जातात आणि ३५० ते ५०० मेट्रिक टन क्षमतेसह क्रेन वापरून उभारले जातात.
त्यामुळे महामार्गावरील तसेच सार्वजनिक वाहतुकीतील व्यत्यय कमी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मेट्रोचे बहुतांश बांधकाम रात्रीच्या वेळी करण्यात येते. सद्यस्थितीत, ३२ किमी लांबीच्या वडाळा ते कासारवडवली या मेट्रो ४ मार्गिकेसाठी पिलर्स, पिलर कॅप आणि गर्डर टाकण्याचे काम सुरु आहे.
यामार्गिकेत एकूण १४७६ खांब उभारण्यात येणार आहेत. या मार्गिकेत ३० स्थानक असून ही संपूर्ण मार्गिका एलिव्हेटेड आहे. आव्हानात्मक परिस्थितींचा सामना करत जवळपास ६४ टक्के खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे.
न्यायालयीन खटल्यांमुळे मेट्रो४ प्रकल्पाला विलंब
सन २०१८ मध्ये मेट्रो४ च्या स्थापत्य कामांना सुरुवात झाली. मात्र,या प्रकल्पात सुरुवातील कोविड महामारी तसेच जमीन अधिग्रहणासंबंधित न्यायालयीन खटल्यांमुळे बराच परिणाम झाला आणि प्रकल्पाची प्रगती मंदावली. त्यानंतर, कारडेपोच्या जागेवरून देखील वाद निर्माण झाल्याने प्रकल्पाचा वेग मंदावला होता.
मात्र, न्यायालयीन निर्णयांनंतर प्रकल्पाचे काम वेगात सुरु झाले. यासोबतच, मेट्रो कारशेडसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील जागा एमएमआरडीएला हस्तांतरीत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मोघरपाडा या ठिकाणच्या १६७ भाडेपट्टेधारक शेतकरी आणि ३१ अतिक्रमणधारक ग्रामस्थ यांच्यासाठी भरपाईची सुयोग्य योजना एमएमआरडीएने त्यांच्या स्तरावरुन करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.