कल्याण - डोंबिवली : डोंबिवली लगत असलेल्या औद्योगिक परिसरातील काही कारखाने गुजरातमध्ये स्थलांतरित होत असल्याची माहिती समोर येत आहे. उद्योगांना मिळणाऱ्या सोयी सुविधांकडे स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्य सरकारच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे उद्योजकांना काम करणे दिवसेंदिवस कठीण होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या स्थलांतराची प्रक्रिया सुरु झाली आहे. कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी अशा प्रकारची प्रक्रिया सुरू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात साडेपाचशे कारखाने आहेत. यात विविध प्रक्रिया उद्योगांसह रासायनिक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे परिसरात प्रदूषणाची समस्या निर्माण झाली असल्याची ओरड स्थानिक रहिवाशांकडून केली जाते. त्याउलट सरकारचे विविध प्रकारचे कर तसेच अन्य आकारणी वेळेवर केल्यानंतरही उद्योगांना आवश्यक त्या सुविधा मिळत नसल्याची तक्रार उद्योजकांकडून केली जात आहे.
गुजरातमधे उपलब्ध असणाऱ्या सोयीसुविधा, सरकारी धोरणे, स्थानिक कामगार, राजकीय पक्ष तसेच नेते यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद यावर उद्योगांकडून अभ्यास सुरु आहे. येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणावर उद्योग स्थलांतरित होण्याची शक्यता बोलली जात आहे. औद्योगिक परिसरात होणाऱ्या प्रदूषणाच्या विविध समस्यांसाठी कायमच उद्योगांना जबाबदार धरले जाते. त्याचप्रमाणे येथे घडणारे अपघात तसेच कारखान्यांना लागणाऱ्या आगीमळे स्थानिक रहिवासी कायमच दडपणाखाली असल्याचे चित्र आहे.
या घटनांमुळे उद्योगांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. परंतु नागरिकांबरोबरच विविध माध्यमातूनही अशा घटनांबाबत शंका उपस्थित केली जाते. अशा परिस्थितीत उद्योग व्यवसाय सुरु ठेवणे अत्यंत कठीण होत असल्यामुळे अनेक उद्योग स्थलांतरित झाले असून येणाऱ्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे उद्योजकांची संघटना असलेल्या कल्याण-डोंबिवली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी यांनी सांगितले.
सरकारचे विविध कर, विविध परवाना फी यांचा वेळेवर भरणा केल्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांच्या दबावामुळे सरकारी यंत्रणा उद्योगांवर कारवाई करतात. मात्र यात उद्योगधंदे भरडले जात असल्याचे जोशी पुढे म्हणाले. आपली जबाबदारी लक्षात घेऊन उद्योजक आपल्या परिसरातील सर्व गोष्टींची सुरक्षा तसेच प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्यास बांधील असतात. परंतु त्यांच्याकडे कायमच अविश्वासाच्या नजरेने बघितले जाते.
याबाबत बोलताना डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे म्हणालेत की, औद्योगिक क्षेत्रात प्रत्येक वर्षी विविध कारणांनी उद्योग बंद होत असतात. परंतु सध्या ज्या पद्धतीचे संदेश समाज माध्यमातून पसरवले जात आहेत यात किती तथ्य आहे? याची शहानिशा करावी लागेल. उद्योजकांच्या संघटनेने या स्थलांतराबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे का? नेमके कोणते उद्योग स्थलांतरित झालेत त्यांची नावे हे समजू शकतील का? असे गंभीर प्रश्न उपस्थित केलेत.
( संपादन - सुमित बागुल )
mumbai news migration of business from marathi dominated dombivali to gujrat
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.