मुंबई, ता. 12 : गेली चौदा वर्षे बंद असलेला मुंबई उपनगरांतील सहकारी गृहनिर्माण संस्थावरील बिगर शेती कर (एन ए टॅक्स) महाविकास आघाडी सरकारने पुन्हा सुरु केला असल्याचा दावा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. हा जिझिया कर तत्काळ बंद करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आपल्या तिजोरीत भर पडण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुंबई उपनगरांमधील बिगरशेती कर पुन्हा वसूल करण्यास सुरुवात केली आहे. या कराला 2006 मध्ये स्थगिती मिळाली होती, मात्र आता पैसे संपल्याने सरकारला पुन्हा हा कर आठवला असल्याचा दावा भातखळकर यांनी केला आहे.
कोरोनामुळे मुंबईकर आर्थिक अडचणीत सापडले असल्याची जाणीव न ठेवता सरकारने ही अन्याय वसुली सुरु केली आहे. एरवी हे सरकार मुंबईकरांना एका रुपयाचीही मदत करत नाही, आणि उलट हा जादा करभार लावला आहे. ही जिझिया व रझाकारी पद्धतीची कर वसुली तात्काळ थांबवावी अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे.
राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेकडून मुंबई उपनगरांतील जमिनींना व्यावसायिक किंवा रहिवासी वापराकरिता रीतसर परवानगी देण्यात आली असली तरीही बिगर शेती कर वसुली केली जात असे. याविरोधात मी स्वतः विधानसभेत तसेच विधीमंडळाबाहेर आवाज उठविल्यानंतर बिगर शेती कर वसुलीला स्थगिती देण्यात आली होती. परंतु कोरोनाची संधी साधून महाविकास आघाडी सरकारने पुन्हा एकदा करवसुली करण्यास सुरुवात केली असून लाखो रुपयांची बिले देण्यात आली आहेत, असेही भातखळकर यांनी दाखवून दिले आहे.
एकीकडे मुंबई शहरातील बांधकाम व्यावसायिकांना प्रीमियम मध्ये पन्नास टक्के टक्के सुट द्यायची, दारू दुकानदारांना कर सवलत द्यायची, ताज सारख्या मोठ्या हॉटेलना कोट्यवधी रुपयांची कर माफी द्यायची आणि दुसरीकडे उपनगरांतील सर्वसामान्य मुंबईकरांकडून सक्तीची कर वसुली करायची हा भेदभाव आहे. महाविकास आघाडी सरकारने तात्काळ ही करवसुली थांबवून मुंबई उपनगरांमधील बिगर शेती कर कायमचा रद्द करावा अशी मागणीही भातखळकर यांनी केली आहे. ही ब्रिटिश कालीन कराची वसुली न थांबल्यास आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
mumbai news non N A tax taken from suburbs atul bhatkhalkar of bjp targets Shivsena
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.