मुंबई, ता. 20 : भाजपवर आक्रमकपणे टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आता भाजप नेत्यांनीही तितक्याच आक्रमकपणे तुटून पडण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. विलगीकरणात असलेले पटोले सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिल्याने, "नाना च्या नाना तऱ्हा, सकाळी आयसोलेशन अन रात्री सेलिब्रेशन", असा टोला भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी त्यांना लगावला आहे.
नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पटोले हे विलगीकरणात गेल्याचे सांगितले जात होते. मात्र तरीही शुक्रवारी (ता. 19) रात्री जुहू येथे शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास पटोले उपस्थित राहिले. पटोले यांच्या या कृतीवर प्रसाद लाड यांनी टीकेची झोड उठवली आहे.
खुद्द पटोले यांनीच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अन्य व्यक्तींसह स्वतः उपस्थित राहिल्याची किमान तीन छायाचित्रे ट्वीट केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुहू, मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले, असे पटोले यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी अन्य नेते-कार्यकर्ते यांच्यात मिसळून हारतुरे-सत्कार या बाबीही केल्याचे छायाचित्रात दिसते आहे. विलगीकरणात असताना सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल लाड यांनी पटोले यांचा समाचार घेतला आहे.
पटोले यांचे जाहीर कार्यक्रमातील ते छायाचित्रही आपल्या ट्वीटमध्ये टाकून लाड यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. "नाना च्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन रात्री सेलिब्रेशन, हाच आहे काँग्रेसचा तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणाऱ्यांना 144 कलम लाऊन अटक करायची. नानाजी मांजरासारखं वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय", असेही लाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर राज्यपालांसह अन्य भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता भाजपने देखील त्यांना लक्ष करून त्यांना त्याचप्रकारे प्रत्युत्तर देण्याचे डावपेच आखल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.
mumbai political news BJP leader prasad lad targets congress maharashtra chief nana patole
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.