मुंबई - गणेशोत्सव जवळ आल्याने रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पालिकेने धावाधाव सुरू केली आहे. गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जन सुरळीत व्हावे, यासाठी रस्त्यांवरील खड्डे भरण्याची कामे युद्धपातळीवर पूर्ण करावीत, खड्डे भरताना रस्त्यांचे समतलीकरण होईल, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचना अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सर्व विभाग कार्यालयांना केली आहे.
मुंबईत १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे. गणेशोत्सवाशी निगडित सर्व कामे योग्यरीत्या व वेळेवर पूर्ण करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
त्यानुसार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवर झालेले खड्डे भरण्याची कार्यवाही वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. असे असले, तरी गणेशोत्सवाच्या कालावधीत कोणत्याही रस्त्यावर खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण होणार नाही, यासाठीची खातरजमा केली जाणार आहे. खड्डे आढळल्यास मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधून युद्धपातळीवर काम करावे, असे निर्देश वेलरासू यांनी दिले आहेत.
विसर्जन मार्गांचा नकाशा बनणार
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना महापालिका आणि पोलिस प्रशासनाने परवानगी दिली आहे. गणेशोत्सव मंडळांना दिलेल्या परवानगीनुसार विभागीय सहायक आयुक्त तथा समन्वय अधिकारी यांनी श्री गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनाचा नकाशा तयार करून आढावा घ्यावा,
तसेच विभागीय सहायक आयुक्त यांनी गणेशोत्सव मंडळांच्या प्रतिनिधींसोबत समन्वय साधून खड्ड्यांबाबतच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी योग्य उपाययोजना करावी, गणेशोत्सवासाठी दिलेल्या परवानगीनुसार मंडप उभारणी केल्याने पडलेले खड्डे बुजवावेत, असे रस्ते सुस्थितीत करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांची असेल, असेही या आदेशांमध्ये नमूद केले आहे.
समतलीकरणावर प्रशासनाचा भर
रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी मॅस्टिक अस्फाल्टचा वापर केला जातो आहे. काही ठिकाणी खड्डे भरल्यानंतर उंचवटा तयार झालेला आढळल्यास त्याचे समतलीकरण करावे.
खड्डा भरल्यानंतर निर्माण झालेला उंचवटा समतलीकरणासाठी विभागीय सहायक आयुक्त यांनी मध्यवर्ती यंत्रणेशी समन्वय साधावा. वाहतुकीदरम्यान अडचणी निर्माण होणार नाहीत, यासाठी खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही वेलरासू यांनी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.