मुंबई : दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेर आज (मंगळवार) सकाळी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानात हलविले आहे.
रविवारी मध्यरात्रीपासून विद्यार्थी गेट वे ऑफ इंडिया येथे एकत्र येण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी दिवसभर हा ओघ कायम होता. रात्री उशिरा अनेक बॉलिवूड कलाकारांनीही एकत्र येत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन केले. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे जाणारा रस्ता काही काळ बंद ठेवावा लागला होता. तसेच गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक वास्तूच्या ठिकाणी आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी आज सकाळी या सर्व विद्यार्थ्यांना आझाद मैदानात हलविले आहे.
मुंबईतील आंदोलन आझाद मैदानाच्या पुढे जाऊ देत नाहीत. मात्र, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलन करत होते. रिगल सिनेमापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत विद्यार्थ्यांनी मोर्चाही काढला होता. "इन्किलाब जिंदाबाद', "हिटलर की चाल चलेगा, वो हिटलर की मौत मरेगा', "मनुवादी सरकार, नहीं चलेंगी नहीं चलेंगी' अशा घोषणांनी गेट वे ऑफ इंडियाचा परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनामध्ये छात्र भारती, आयआयटी मुंबई, टाटा समाज विज्ञान संस्था, झेवियर्स, रुपारेल, मिठीबाई महाविद्यालय, जामिया विद्यापीठ असे विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी आणि संघटनांच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. अखेर आता या विद्यार्थ्यांना तेथून हलविण्यात आले आहे.
नेते, अभिनेत्यांचा पाठिंबा
या आंदोलनात सहभागी होत अभिनेता सुशांत सिंह, दिग्दर्शक अनुराग कश्यप, अभिनेत्री तापसी पन्नू यांनी भ्याड हल्ल्याचा निषेध केला. अशाप्रकारे लपून विद्यार्थ्यांवर हल्ला करणे अयोग्य आहे. या मनुष्यभक्षकांपासून आपला देश वाचवायला हवा. म्हणून मी या आंदोलनात सहभागी झालो आहे, अशी प्रतिक्रिया सुशांत सिंह याने व्यक्त केली. या आंदोलनात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहित पवार, अबू आझमी, संजय निरुपम, कपिल पाटील, प्रकाश रेड्डी सहभागी झाले होते.
निवडणुकीपूर्वीच असे का घडते? : रोहित पवार
"जेएनयू'त विद्यार्थी शांततेने फीवाढीविरोधात आंदोलन करीत होते. तेथे अचानाक 40 जण येऊन त्यांच्यावर हल्ला करतात. हे सर्व जण अचानक विद्यापीठात कसा काय प्रवेश करू शकतात, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला. हल्लेखोर विद्यापीठात घुसल्यानंतर पोलिस तेथे आले. मात्र, मारहाण करताना ते आत का गेले नाहीत? विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी विद्यापीठाचे कुलगुरू असणे गरजेचे आहे. मात्र, गेले काही दिवस तेदेखील दिसत नाहीत, असे रोहित पवार म्हणाले. दिल्लीत निवडणुका येऊ घातल्यात. प्रत्येक निवडणुकीपूर्वी काहीना काही घटना घडताना सध्या पाहायला मिळतेय, असे पवार म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.