पहिल्याच पावसात मुंबईची अवस्था अत्यंत केविलवाणी
मुंबई: पहाटेपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने आज मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढलं. पावसाच्या पाणी सखल भागात तर साचलंच; पण दरवर्षी जिथे पाणी साचत नाही तिथेही यंदा पाणी तुंबल्याचा आरोप मनसेने केला. मेट्रोची अर्धवट राहिलेली कामे आणि कोस्टल रोडचं काम यामुळे असं घडल्याचं मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले. काँग्रेसचे पालिका गटनेते रवी राजा यांनीही मुंबई पालिकेचा १०४ टक्के नालेसफाईचा दावा खोटा असल्याचं म्हटलं. त्यानंतर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही एक ट्वीट केलं. वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि मुंबईतील पाणी तुंबण्याबद्दलचं ट्वीट करत त्यांनी पालिका आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं. (Mumbai Rains Sachin Waze BJP Leader Keshav Upadhye Tweet criticizing Shivsena)
"पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. १०४ टक्के गाळ काढल्याचा दावा केला गेला, पण नाल्यातील गाळाऐवजी सर्वसामान्यांनी महापालिकेला भरलेल्या करातून माल काढला गेला. १०० कोटींचं टार्गेट असणारा १ सचिन वाजे सापडला, पण असे सचिन वाजे ठिकठिकाणी असल्यावर सर्वसामान्य मुंबईकराच्या नशिबी तुंबलेली मुंबई", असं ट्वीट करत केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
तुंबलेल्या मुंबईबद्दल मनसेचं मत...
"पावसाळ्यात मुंबईच्या सखल भागात पाणी तुंबायचं ही गोष्ट लोकांनी स्वीकारलीच होती. पण एक महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी जिथे सखल भाग नाही, अशा दक्षिण मुंबईतील भागात किंवा इतर उपनगरीय भागातदेखील पाणी तुंबल्याचं किंवा साचल्याचं चित्र आहे. जिथे आजपर्यंत कधीही पाणी तुंबत नव्हतं तिथेही आता पाणी तुंबायला लागलंय ही गांभीर्याची गोष्ट आहे. नुसती वरवरची उपाययोजना करून मुंबईकरांना दिलासा मिळणं शक्य नाही. ठिकठिकाणी चालू असलेली मेट्रोची कामं, वरळीच्या कोस्टल रोडची कामं यामुळे अशाप्रकारे पाणी तुंबताना दिसत आहे. त्यामुळे एक लक्षात घेणं गरजेचं आहे विकास करताना इतरांची गैरसोय होऊ नये", असं रोखठोक मत मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलं.
काँग्रेसचंही शिवसेनेवर टीकास्त्र
"मुंबई महानगर पालिकेने १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा जो दावा केला होता त्याची पोलखोल झाली. चार दिवस आधी काँग्रेसचे पदाधिकारी आणि मी स्वत: नालेसफाईची पाहणी केली आणि प्रशासनाला सांगितलं की हे काम अद्याप नीट झालेलं नाहीये. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. सध्या चित्र असं आहे की पहिल्या पावसात मुंबई पूर्णपणे तुंबली आहे. याची जबाबदारी निश्चितच मुंबई पालिकेची आहे. पालिका ७० कोटी रूपये खर्च करून नालेसफाई करते मग त्याचं काय झालं. १५ मे रोजी मुंबई पालिका सर्व काम संपवून सज्ज असायला हवी होती. पण सध्या चित्र फारच विचित्र आहे", अशा शब्दात पालिकेतील काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.