उरण - उरण तालुक्यातील दोन लाख जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यावर आधारित आठ उपकेंद्र उभारली आहेत. मात्र, या केंद्रांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्याने विविध समस्यांनी ग्रासले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.
रायगड, नवी मुंबई येथील उरण हा डोंगर, खाडीकिनारी वसलेला तालुका आहे. या तालुक्यात भात शेतीची कामे करणारे आगरी, कोळी, कराडी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. असे असले तरी आदिवासी बांधवही मोठ्या संख्येने डोंगर परिसरात वास्तव्य करत आहेत.
अशातच पावसाळ्यात या परिसरात साथीजन्य रोगाबरोबर सर्पदंशाचे प्रमाणही वाढत आहे. पण उरणमधील सुमारे दोन लाख नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोप्रोली येथे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.
या केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, परिचारिका यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे तुटपुंज्या मनुष्यबळाच्या जोरावरच रुग्णांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील आठ उपकेंद्रांत रिक्त असणाऱ्या जागांमुळे रुग्णांना सुविधांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.
दिघोडेतील केंद्राकडे दुर्लक्ष
कोप्रोलीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची वाणवा आहे. त्यात सध्या पावसाळ्यात छतातून, भिंतीतून झिरपणारे पावसाचे पाणी, पाण्याच्या टाकीला लागलेली गळतीसारख्या विविध समस्यांनी आरोग्य केंद्राला वेढले आहे.
त्यामुळे रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांची हेळसांड होत आहे. त्यामुळे दिघोडे येथील रेंगाळत पडलेल्या उप प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम मार्गी लावण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली व तालुक्यातील आठ उपकेंद्रांत आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, डॉक्टर, परिचारिका, आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, मदतनीस यांची पदे रिक्त आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष केंद्रित करावे.
- बी. एम. ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते, विंधणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.