मुंबई - प्रामाणिकपणा, निःस्वार्थीपणा व निर्भयपणे केलेले काम आणि माहिती व अनुभवाच्या साह्याने अंतर्मनाचे ऐकून घेतलेले निर्णय या गुणांमुळेच नारायणन वाघूळ यांनी आजच्या आधुनिक बँकिंग क्षेत्राचा पाया रचला, असे गौरवोद्गार केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज येथे काढले.
ज्येष्ठ बँकिंगतज्ञ नारायणन वाघूळ यांनी आपल्या बँकिंग क्षेत्रातील अनुभवावर लिहिलेल्या रिफ्लेक्शन या पुस्तकाचे प्रकाशन आज त्यांच्या हस्ते येथे झाले. पिरामल उद्योगसमूहातर्फे हा समारंभ आयोजित करण्यात आला होता.
पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल, नॅशनल बँक फॉर फायनान्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट चे अध्यक्ष के. व्ही. कामत, जेपी मॉर्गन च्या दक्षिणपूर्व आशिया विभागाच्या माजी अध्यक्ष कल्पना मोरपारिया, पिरामल समूहाच्या उपाध्यक्ष स्वाती पिरामल आदी मान्यवर यावेळी हजर होते.
प्रामाणिकपणामुळे बँकिंग क्षेत्रात वाघूळ यांना प्रचंड मान होता. ते आपल्या अंतर्मनाचे ऐकून निर्णय घेत, मात्र ती मनमानी नसे तर त्यापूर्वी ते प्रचंड माहिती आणि तपशील बघत. तसेच त्यांच्या निर्णयांमध्ये निस्वार्थीपणा आणि निर्भयपणा होता. याचमुळे त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय बँकिंग क्षेत्राने मोठी मजल मारली असेही श्रीमती सीतारामन म्हणाल्या.
खाजगी बँकांच्या राष्ट्रीयीकरणानंतर बँकिंग क्षेत्रामध्ये कसा बदल झाला, समाजवादी विचारसरणीच्या काळात बँका कशा काम करत होत्या, बँकांमधल्या कामगार संघटना, त्यांच्या वाटाघाटी, रिझर्व बँकेच्या गव्हर्नर ने कठीण काळात घेतलेले निर्णय, हे सगळे अनुभव कसलीही कटूता न ठेवता, चुकांसाठी कोणाचाही गळा न धरता वाघूळ यांनी आपल्या पुस्तकात समंजसपणे मांडले आहेत, असेही सितारामन म्हणाल्या.
तर वाघूळ यांनी आयसीआयसीआय बँक वेगळ्याच उंचीवर नेण्याची पायाभरणी केली व तिचे क्षेत्र विस्तारले. क्रिसिल या पहिल्या रेटिंग एजन्सीची स्थापना त्यांनी केली, वंचित मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी प्रथम ही समाजसेवी संस्था स्थापन केली.
तसेच बँकिंग क्षेत्रात स्त्रियांना नोकरी देण्याची दारे त्यांनी खुली केली. त्यामुळे आज बँकांमध्ये अनेक स्त्रिया वरिष्ठ पदावर आहेत. वाघूळ हे देशाच्या अर्थव्यवस्थेतील भीष्मपितामह आहेत अशा शब्दांत अजय पिरामल यांनी त्यांचा गौरव केला. तर वाघूळ यांनी आम्हाला मोठी स्वप्ने बघण्याची ऊर्जा दिली, असे कामत म्हणाले.
नैतिक मूल्यांचा ऱ्हास
या साऱ्या बदलांचे श्रेय मी स्वतःकडे घेणार नाही. हे श्रेय सर्वांचेच आहे, कामत तसेच श्रीमती कल्पना मोरपारिया आदी सर्वांनी हे प्रयत्न पुढे नेले, असे वाघूळ यांनी प्रांजळपणे सांगितले. गेली साडेपाच हजार वर्षे परकीय आक्रमणांनंतरही आपल्या देशाची अध्यात्मिक आणि नीतीमूल्ये कायम राहिली. मात्र आता त्या नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत आहे याची भीती वाटते असेही ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.