विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यावर आता संभाव्य उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून लढायला सज्ज झाले आहेत. मिरा-भाईंदर मतदारसंघात उमेदवारी कोणाला मिळेल, याबाबत प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार जवळपास अंतिम झाला असून केवळ अधिकृत घोषणेची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. महायुतीमध्ये उमेदवारीबाबत अजूनही संभ्रमाचे वातावरण कायम आहे. त्यामुळे उमेदवारी नक्की कोणाला मिळणार, यावरच सध्या मतदारांमध्ये खमंग चर्चा रंगलेली आहे.
मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात गीता जैन या अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्या. काही झाले तरी आता पुन्हा निवडणूक लढवायचीच, असा चंग त्यांनी बांधला आहे व त्यादृष्टीने जोरदार तयारीदेखील चालवली आहे. मात्र त्यांनाही महायुतीत नेमकी कोणाकडून उमेदवारी मिळेल, तसेच ती मिळणार की नाही, याची शाश्वती नाही.