मुंबई : कविवर्य वसंत बापट आणि शांता शेळके या दोघांचेही लेखन बहिर्मुख स्वरूपाचे होते. दोघेही प्राध्यापक होते. त्यांच्यात लेखनातून अकृत्रिम, साधेपणा हा महत्त्वाचा गुण दिसतो. दोघांनीही मराठी साहित्य विश्वात कविता आणि गद्य लेखनात खूप मोठे योगदान दिलेले असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांनी आज व्यक्त केले.
कविवर्य वसंत बापट आणि शांताबाई शेळके जन्मशताब्दी वर्ष निमित्ताने मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे एका विशेष परिसंवादाचे आयोजन कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन येथे करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते झाले यावेळी मराठी विभागाच्या विभाग प्रमुख व परिसंवादाच्या निमंत्रक डॉ. वंदना महाजन, डॉ. सुनील अवचार, महावीर जोंधळे, अनिल सपकाळ, अरुण खोरे, अरुण म्हात्रे आदी उपस्थित होते. यावेळी ढेरे या काही कारणास्तव उपस्थित राहू शकल्या नव्हत्या, त्यामुळे त्यांनी पाठवलेले भाषण उद्घाटन सत्रातील बीजभाषण प्रा. नितीन आरेकर यांनी वाचून दाखवले. त्यात त्यांनी बापट आणि शेळके यांच्या लेखनातील साम्य विषद केले.
ढेरे पुढे म्हणाल्या की, दोघेही कवी होते. दोघांच्याही साहित्याची एक बाजू ही रंजनपर साहित्याला जोडलेली होती पण दोघांमध्येही असलेले निखळ वाङमय प्रेम आणि वाङमय परंपरेची उत्तम जाण दिसून येते, शांताबाई ने वाड्मय इतिहासाच्या संदर्भात आजच्या गुगलची भूमिका निभावली अद्भुत स्मरणशक्ती आणि नव्या जुन्या वाङमयीन परंपरेची ओळख त्यांच्या बळावर ललित गद्द्यांचा वैभव त्यांनी वाढवला खास मराठी संस्कृतीचा स्पर्श त्यांच्या सर्व लेखनाला आहे.
तर बापट मूळचे कवी होते आणि त्या खालोखाल नाटकवाले होते महाविद्यालयीन काळात त्यांनी नाटक केली गाजवली पण पुढे ते नाटकासाठी रंगभूमीकडे वळले नाहीत त्यांच्या अंगी असलेलं नाटक त्यांच्या कवितेच्या नाट्यपूर्ण अभिव्यक्तीत आणि तिच्या सादरीकरणात उतरले असल्याचे मतही ढेरे यांनी व्यक्त केले. वाङमय अभ्यासाच्या क्षेत्रातलं त्यांचे योगदान गौरवणे हा परिसंवादाचा एक पैलू असला पाहिजे पण शाळा महाविद्यालयांमधून या हेतूने जन्मशताब्दी साजरी होऊन विद्यापीठ पातळीवर अधिक खोल आणि अधिक उद्बोधक असा मुख्य हेतू असला पाहिजे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
परिसंवादाचे उद्घाटक व विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. आज पेडणेकर म्हणाले की, शांता शेळके व वसंत बापट ज्या महाविद्यालयात शिकले त्याच महाविद्यालयात मीही शिकलो. त्यांच्यामुळेच मला कला आणि वाङमय विषयाची गोडी लागली. त्यांचे योगदान पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्यासाठी हे कार्य सुरू राहिले पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना मराठीतील अशा साहित्यिकांच्या योगदानाच्या कार्याची उजळणी व्हायला हवी अशी सूचनाही कुलगुरूंनी केली.
उदघाटनाच्या पहिल्या परिसंवादात 'वसंत बापट - साहित्य आणि सामाजिक दृष्टीकोन' या विषयावर महावीर जोंधळे, अरुण खोरे, अरुण म्हात्रे आदींनी आपले विचार मांडले. दुसऱ्या परिसंवादात 'शांता शेळके यांचे साहित्य' या विषयावर कौशल इनामदार, नीलिमा गुंडी, वंदना बोकील - कुलकर्णी यांनी ललित गद्य, कविता यावरील अनेक पैलू उलगडून दाखवले. तर समारोपाच्या भाषणात कवी निरजा यांनी शांता शेळके आणि वसंत बापट यांच्या साहित्यातील भावविश्व आणि त्यातील विविध पैलू उलगडून दाखवले. त्या म्हणाल्या की,वसंत बापट यांचे कार्य केवळ साहित्यापुरते मर्यादित नव्हते राष्ट्रसेवा दलापासून तर वेगवेगळ्या चळवळींत समाजाच्या जडणघडणीमध्ये त्याचे योगदान होते. शांताबाई यांचे अनुवाद लेखन ही तेवढे दर्जेदार होते. त्यामुळे त्या पैलूवर संशोधकांनी नव्याने प्रकाश टाकण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.