मुंबई, ता. २१ : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात कुर्ला, चांदिवली, कलिना, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम आणि विलेपार्ले हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. बुधवारी झालेल्या मतदानात मतदानाची टक्केवारी वाढल्यामुळे सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यामुळे यंदाही लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती होणार असल्याचे संकेत आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा विधानसभा निवडणुकीची टक्केवारी दोन ते चार टक्याने वाढली आहे. मैदानावरची परिस्थिती पाहता सहा मतदारसंघांपैकी मविआला चार तर, महायुतीला दोन जागा असा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.