मुंबई, ता. २१ ः दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी चार विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने आघाडी घेतली होती, तर उर्वरित दोन मतदारंसघांमध्ये भाजपने आपला दबदबा सिद्ध केला, मात्र विधानसभा निवडणुकीत मनसे उतरल्यामुळे चांगलीच रंगत आली आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणकीच्या तुलनेत या वेळी सहाच्या सहाही मतदारसंघांत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे या वेळी दोन्ही आघाडीपैकी एकाला स्पष्ट कौल मिळणे कठीण असल्याचे दिसून येते.
लोकसभा निवडणुकीत मुंबादेवी, वरळी, शिवडी, भायखळा या चार विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीने आघाडी घेतली, तर मलबार हिल, कुलाब्यात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले होते. सहा महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेच्या प्रवेशामुळे चित्र किंचित बदलले आहे, मात्र मतदानाचा पॅटर्न हा लोकसभेप्रमाणे असल्याचे मतदारांशी बोलताना स्पष्टपणे जाणवत होते.