मुंबई : कोरोनासंकटामुळे लॉकडाऊन असल्याने अनेक जण घरातूनच कार्यालयीन काम करत आहेत. त्यामुळे नेहमीच्या जीवनशैलीत बदल झाल्याने पचनसंस्थेवर दुष्परिणाम होत आहे. मुंबईकर अॅसिडिटी, अपचन, पित्त अशा आजारांनी हैराण झाले असून, औषधांच्या दुकानात इनो, जेल्युसिल, डायजिन अशा अॅंटासिड औषधांची मागणी वाढली आहे.
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडणे बंद झाले. शारिरीक हालचाल कमी झाली, व्यायाम बंद झाला. जेवणाच्या व झोपेच्या वेळा बदलल्या. ’वर्क फ्रॉम होम’ सुरू असल्याने दिवसभर एकाच जागी बसावे लागते. त्यामुळे हालचालच होत नाही आणि अपचनाचा त्रास होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे, असे चक्र सुरू झाल्याने खाण्यापिण्याच्या वेळा बदलल्या आहेत.
सकाळी 9 ते 10 ही नाश्त्याची वेळ 11 ते दुपारी 12 पर्यंत गेली. त्यामुळे जेवणाची वेळही दुपारी 2 ते 3 आणि रात्रीच्या जेवणाची वेळी 10 वाजल्यानंतर अशी झाली आहे. अशा वेळा पचनसंस्थेसाठी हानिकारक आहेत. त्यातच रात्रीचा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल, टीव्ही, संगणकापुढे बसण्याची वेळ वाढल्याने झोपेची वेळही मध्यरात्रीनंतर 1 किंवा त्यापुढेच गेली आहे. त्यामुळे छातीत जळजळ, अस्वस्थ वाटणे असे त्रास वाढले आहेत.
लॉकडाऊनमध्ये बाहेरचे खाणे बंद झाले असले, तरी घरात गृहिणी चमचमीत पदार्थ बनवत आहेत. वडे, भजी, पिझ्झा असे पदार्थ अॅसिडिटीला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन कमी प्रमाणात करण्याचे आवाहन आहारतज्ज्ञ करत आहेत. इनो, जेल्युसिल, डायजिन व अन्य पित्तशामक गोळ्या, औषधे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती दादरमधील एका औषध दुकानदाराने दिली.
आहारतज्ज्ञांचा सल्ला
- किमान अर्धा तास तरी घरातच व्यायाम करावा, घरातल्या घरात चालावे.
- खाण्यापिण्याच्या वेळा पाळाव्यात. भरपूर पाणी प्यावे, रात्री हलके जेवण घ्यावे.
- चहा, कॉफी, शीतपेये वारंवार पिणे टाळावे. लिंबूपाणी, कोकम-आवळा सरबत प्यावे.
उन्हाळा सुरू झाल्यावर अपचनाच्या तक्रारी वाढतात. लॉकडाऊनमध्ये बदलेल्या सवयी अपचनाला कारणीभूत ठरत आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण ओपीडीत कमी येतात. अॅसिडिटी, बद्धकोष्ठतेच्या तक्रारी पूर्वीप्रमाणेच आहेत. खाण्यापिण्याच्या वेळा नियमित ठेवणे गरजेचे आहे. थोडा तरी व्यायाम करावा, तेलकट पदार्थ खाऊ नयेत.
- डॉ. अमित घरत, पोटविकार तज्ज्ञ, केईएम रुग्णालय
Mumbaikar harassed by acidity, indigestion
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.