क्या बात है..! वरळी, धारावीत कोरोनाचे थैमान असताना 'या' वस्तीने घालून दिला वेगळाच आदर्श; वाचा सविस्तर...

kamathipura
kamathipura
Updated on

मुंबई : कामाठीपुरा म्हटलं की सर्वच जण नाके मुरडतात; मात्र याच कामाठीपुऱ्यात आज सकारात्मक गोष्ट घडली आहे. मुंबईतील अनेक वस्त्यांमध्ये कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला असतांना कामाठीपुऱ्यातील 'रेड लाईट' एरिया 'ग्रीन झोन' झाला आहे. समाजासाठी उपेक्षित असणाऱ्या या परिसराने अनपेक्षित अशी किमया साधली आहे.

मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर कामाठीपुरा ही लॉकडाऊन झाला. परिसरातील 'रेड लाईट' एरिया म्हणून ओळखला जाणारा देहविक्रीचा व्यवसाय ही बंद पडला. देहविक्री करणाऱ्या महिलांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचे कसे होणार हा सर्वांना प्रश्न पडला. प्रश्न होता तो लॉकडाऊन मध्ये पोटाची खळगी भरण्याचा. मात्र समाजसेवी संस्थांसह काही दानशूर व्यक्ती या महिलांच्या पाठीशी उभे राहिले, त्यांना अन्न-धान्य पुरवलं आणि त्यांच्या रोजच्या जीवन मरणाचा प्रश्न निकाली काढला.

कामाठीपुरा परिसरातील एकूण 13 गल्ल्यांमध्ये पसरलेल्या या परिसरात एक ते दीड लाख लोकसंख्या आहे. त्यातील 'रेड लाईट' एरियात साडे पाच हजाराहून अधिक महिला देहविक्रीचा व्यवसाय करीत होत्या. तर त्यापेक्षा कितीतरीपटीने अधिक असलेले त्यांचे कुटुंबीयही येथे वास्तव्यास आहेत. एकेका छोट्या छोट्या खोलीत 5 ते 6 लोकं दाटीवाटीने राहतात. या परिसरात नेहमीच लोकांची रेलचेल बघायला मिळते. ग्राहकांची गर्दी असते. त्यामुळेच कोरोना संसर्गाने शिरकाव केल्यानंतर इथली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल अशी भीती व्यक्त होत होती.

सुरुवातीला इथेही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला. हा संसर्ग अधिक पसरण्याचा धोका होता, त्यामुळे पालिकेने हा परिसर 'कंटेन्मेंट झोन', 'रेड झोन' म्हणून घोषित करत यंत्रणा कामाला लावली. परिसर सील करून लोकांची ये-जा थांबवली. 'फिवर क्लिनिक'च्या माध्यमातून लोकांची तपासणी सुरू केली. पालिकेच्या मदतीला अनेक सामाजिक संघटनांनी ही स्वतःला झोकून दिले.

कामाठीपुऱ्यात अनेक सामाजिक संघटना कामाला लागल्या. सर्वात कठीण काम होते ते देहविक्री करणाऱ्या महिलांना कोरोना संसर्ग, त्याचे दुष्परिणाम आणि घ्यायची काळजी याबाबत माहिती देणे. पालिकेसह सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गल्लीबोळात जाऊन, घराघरात पोचून इथल्या लोकांना कोरोना संसर्गाची माहिती दिली. या महिलांनी ही सामाजिक कार्यकर्त्यांना पूर्ण सहकार्य केले.

या परिसरात स्वच्छतेवर भर देण्यात आला. सर्वांनी मास्क घातला, सॅनिटायझरचा वापर सुरू झाला. पालिका तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या घराबाहेर न पडण्याच्या सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात आले. अर्थात यासाठी आवश्यक मार्गदर्शन तसेच मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा येथे अपेक्षेप्रमाणे करण्यात आला. त्यामुळे आज अडीच महिन्यानंतर कामाठीपुऱ्यात एकही मूळ रहिवासी कोरोना बाधित नाही.

कामाठीपुऱ्यातील 'रेड लाईट' परिसराची सर्वांना धास्ती होती. या परिसरात जर कोरोना ने शिरकाव केला तर परिस्थिती गंभीर झाली असती. मात्र गेल्या अडीच महिन्यात 'रेड लाईट' परिसरात कोरोना चा शिरकाव रोखण्यात यश आले. एकीकडे धारावी, वरळी, प्रभादेवीसह मुंबईतील इतर झोपडपट्ट्यांचे परिसर कोरोना 'हॉट स्पॉट' बनत असतांना मात्र 'बदनाम वस्ती' म्हणून पाहिलं जाणाऱ्या 'रेड लाईट' परिसराची एक वेगळाच आदर्श घालून दिला.

'रेड लाईट' परिसरातील लोकांना पालिका ,स्थानिक राजकारणी तसेच सामाजिक संघटनांनी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. त्यामुळे धंदा बंद असून ही तेथील महिलांची आणि त्यांच्या कुटुंबियांची उपासमार झाली नाही. आता ही या परिसरात मदतीचा ओघ सुरू आहे. मात्र पुढे ही मदत सुरू राहीलच असे नाही. त्यामुळे यातील महिलांना इतर रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे असे प्रेरणा संस्थेच्या प्रमुख प्रीती पाटकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.