मुंबई : मुंबई पालिकेतील भ्रष्टाचार समोर आणणारे भाजपचे आमदार अमित साटम यांनी पुन्हा मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. पालिकेच्या निविदा प्रक्रियेत केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सीव्हीसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाले असून मोठा भ्रष्टाचार करण्यात आला असल्याचा आरोप अमित साटम यांनी केला. याचा संबंध पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी असल्याचे सांगत त्यांनी याबाबत सतर्कता आयोगाला पत्रही दिले आहे.
इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांसाठी २५ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती; परंतु याच दिवशी ३ वाजून ३५ मिनिटाला अचानकपणे शुद्धिपत्रक काढण्यात आले आणि यात निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांच्या पात्रता अटीच बदलण्यात आल्या; तर बदललेल्या पात्रता अटीत विदेशी कंपन्या आणि विदेशातील पात्रता अनुभवही ग्राह्य धरण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही अट अचानकपणे बदलणे कायदेशीर नाही, असे अमित साटम यांनी म्हटले. यामुळे संपूर्ण निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याचे त्यांनी सांगितले.
एका विशिष्ट परदेशी कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी ही निविदा प्रक्रिया राबवल्याचा आरोप साटम यांनी केला. ही निविदा प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश देऊन या प्रक्रियेतील अनियमिततांचा शोध घेऊन संबंधितांवर कारवाई करावी व नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी साटम यांनी केली आहे.
कोणतीही अनियमितता नाही!
इलेक्ट्रिक बसगाड्यांच्या निविदेबाबत तथ्यहीन माहिती प्रसारित होत आहे, असे पालिका प्रशासनाने म्हटले. या निविदेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून निविदाधारकांच्या विनंतीनुसार त्यांच्यासोबत बैठका घेऊन जागतिक पातळीवरच्या व्यवसाय संस्थांना या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेता यावा, यादृष्टीने बेस्ट उपक्रमाने या निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ केली आहे.
जेणेकरून चांगले स्पर्धात्मक दर प्राप्त होतील आणि जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वातानुकूलित बसगाड्या मुंबईकरांसाठी उपलब्ध होतील, असे पालिकेने सांगितले. याबाबत महाटेंडर पोर्टलवर व्यापक प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे इच्छुक निविदाधारकांना याबाबत ई-मेलद्वारेही कळविण्यात आले आहे. निविदाकारांना निविदा प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याकरिता अजून संधी उपलब्ध आहे, असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.