मुंबई, ता. 25 : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी आगामी महानगरपालिका निवडणूकांत काॅग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. राज्यातील आगामी महानगरपालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वांनी एकदिलाने काम करून काँग्रेस पक्षाला विजयी करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार व ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या बैठका घेऊन निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, सध्या राज्यात काँग्रेस पक्षाला अनुकुल वातावरण असून काँग्रेस पक्षाला मानणारे लोकही मोठ्या संख्येने आहेत, कार्यकर्त्यांनी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवरून काम करा आणि स्वबळावर लढण्यास तयार रहा. महापालिका निवडणुकीत वॉर्डनिहाय जबाबदारी दिली जाईल त्यानुसार काम करून पक्षाने दिलेल्या उमेदवाराला निवडून आणा.
कल्याण डोंबिवलीचा आढावा घेताना प्रतांध्यक्षांनी सर्व पदाधिकाऱ्यांची नावे घेऊन उपस्थित आहेत का हे पाहिले. काँग्रेसचे सैनिक म्हणून काम करा. पक्षाचे सर्व सेल, विभाग, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल, एनएसयुआयच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे गरजेचे आहे त्यांना सोबत घ्या. काँग्रेस पक्षात सर्व समाज घटकाला न्याय देण्याची भूमिका राहिली आहे. चांगले काम केले तर आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसची सत्ता येईल असा विश्वास प्रदेशाध्यक्ष यांनी व्यक्त केला. या आढावा बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काही अडचणी मांडल्या व काही सुचनाही केल्या. प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊन पक्ष त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास दिला.
महत्त्वाची बातमी : मुंबईत नव्या रुग्णांचा भडका; कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या पार
यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार कुणाल पाटील, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आणि महाराष्ट्राचे सहप्रभारी बी.एम. संदीप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, माणिकराव जगताप, मोहन जोशी, माजी आ. मधू चव्हाण डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.
nana patole on municipal corporation election congress will contest election by its own
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.