चंद्रकांत पाटलांनी गडकरींचे तोंड बंद केले!; काँग्रेसचा बड्या नेत्याचा आरोप
मुंबई: 'केंद्रात जसे एक पप्पू आहेत तसेच राज्यातही एक पप्पू आहेत', अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर निशाणा साधला. त्यावर आज नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं. "राज्यातील सत्ता गेल्यापासून भाजपचे नेते सैरभेर झालेले आहेत. केंद्राच्या मदतीने राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सगळे प्रयत्न विफल झाल्याने आता त्यांचा तोल ढासळला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही ती आमची संस्कृती नाही. चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणूकीचे पाप झाकता येणार नाही", असे प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चंद्रकांत पाटलांना दिले. (Nana Patole Pappu Devendra Fadnavis Tarbujya Chandrakant Patil Champa Remarks Congress vs BJP Verbal Fight)
नाना पटोलेंनी या मुद्द्यावर पत्रकारांशीही संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, "केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. गेल्या आठ महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी मोदी सरकारकडे काही ठोस धोरण नाही. लसीकरण मोहिमेचा बोजवारा उडालेला आहे. गंगेच्या पात्रातून वाहणारे मृतदेह हजारे जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे मोदी सरकारच्या अब्रुची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. मोदी सरकारने केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री बदलून मोदींनी आपल्या अपयशाची कबुलीच दिली आहे. पण चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करून मोदी सरकारचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत."
"चंद्रकांत पाटलांनी आमच्यावर कितीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करावी. त्यांनी आम्हाला कितीही हिणवले तरी आमची हरकत नाही, त्यांनी आमच्यावर केलेल्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनाश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळणार असेल. मोदी सरकारने आणलेले तीन शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द होणार असतील. केंद्र सरकारने जाणिवपूर्वक कोर्टाच्या माध्यमातून रद्द केलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर चंद्रकांत पाटलांच्या टीकेचे स्वागतच आहे", असेही ते म्हणाले.
चंद्रकांत पाटलांनी गडकरींचे तोंड बंद केले!
"नितीन गडकरी यांच्या कारखान्याची चौकशी करण्याची मागणी अमित शाह यांच्याकडे करून चंद्रकांत पाटील गडकरींचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न करत असतील. पण आमचा आवाज ते बंद करू शकणार नाहीत. आम्ही देशातील गरीब, कष्टकरी जनता व शेतक-यांच्या न्याय हक्कांसाठी आवाज उठवत राहू. ईडी सीबीआयचा वापर करून मोदी शाह आमचा आवाज बंद करू शकले नाहीत. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी पोपटपंची करण्यापेक्षा केंद्राने जाणिवपूर्णक अडवून ठेवलेले मराठा आणि ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.