"आज जर महाराज असते तर...."; राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

"आज जर महाराज असते तर...."; राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
Updated on

"केंद्रातील महाराष्ट्राचे मंत्री राज्याचं नाव बदनाम करतायच असा आरोप ठाकरे सरकारचे मंत्री आणि संजय राऊत करत आहेत. ते उठसूट छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतात. आज जर खरंच महाराज असते तर १०० कोटी जमा करायला लावणाऱ्यांचा थेट कडेलोट केला असता. अनिल परब कोणासाठी कलेक्शन करतो सगळ्यांना माहितीये. शिवसेनेत कोणतंही पद फुकट मिळत नाही. सचिन वाझे, अनिल परब, अनिल देशमुख आणि त्यांना प्रोत्साहन देऊन भागीदारी घेणारे या साऱ्यांनी राज्य खराब केलं", अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर तोफ डागली.

राज्यात सध्या कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून महाराष्ट्र विरूद्ध केंद्र सरकार असा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच मुद्द्यावर आज राणे यांनी मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. "सध्या कोरोना प्रतिबंधक लसीवरून राजकारण सुरू आहे. राज्य सरकार केंद्रावर आगपाखड करत आहे. तुम्ही केंद्राकडे बोट दाखवू नका. माझं असं स्पष्ट मत आहे की मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र कोरोना रोखायला कमी पडला.", अशा शब्दात राणे यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली.

"महाराष्ट्रात मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढवताना दिसतेय. पण याचं गांभीर्य सरकारला नाही. ते केवळ केंद्राकडे बोट दाखवत आहेत. मुख्यमंत्री म्हणत असतील की माझं कुटुंब माझी जबाबदारी तर मग राज्यात डॉक्टर, नर्स, व्हेंटिलेटर बेड्स पुरवणं ही कोणाची जबाबादारी आहे? कोरोना आल्यावर मुख्यमंत्री पिंजऱ्यात जाऊन का बसतात? ते मातोश्रीबाहेरच पडत नाहीत. मग त्यांना कोरोना होईलच कसा? ज्यांच्या घरातील सर्व लोक कोरोनाग्रस्त आहेत ते आम्हाला कसं सांभाळणार?", असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जनाची नाही मनाची तरी लाज बाळगा!

"तुम्ही सचिन वाझेला मुंबईतून १०० कोटी जमा करायला सांगितले होते. त्यात नक्कीच मुख्यमंत्री पण सहभागी आहेत. हे जमा केलेले पैसे लसीसाठी का वापरत नाही? सध्या रत्नागिरीत आरोग्यसेवकांची १४६ तर सिंधुदुर्गात ३१६ रिक्त आहेत. वर्षभरात ५४ हजार रूग्ण दगावले. मग ही पदं रिक्त का ठेवली? या साऱ्याला मुख्यमंत्री जबाबदार आहेत. आरोग्य विभागाला आदेश देऊन ही पदभरती करायला हवी होती. माझ्या हॉस्पिटलमध्ये एकही रिक्त नाही. एवढ्या महिन्यांमध्ये एकाही मंत्र्याने हॉस्पिटल बांधलं नाही. आरोग्यसेवा केली नाही. जनाची नाही मनाची तर लाज वाटत नाही का?", अशी टीका राणे यांनी केली.

राज्याची आर्थिक स्थिती सांभाळायला ५ वर्षे लागतील!

"आपातकालीन स्थितीत प्रत्येक राज्याकडे विशेष निधी तरतूद असते. आमच्याकडे एकच दिवसाची लस आहे. असं कसं... हा स्वत:चे अपयश झाकण्याचा प्रकार सुरू आहे. दररोज म्हाडाची प्रकरणं उघड होतायत. काम न करता कंत्राटदाराला पैसे देतायत. उद्या सरकार गेलं तर माझं काय म्हणून सगळे खात सुटलेत. राज्यासाठी दीड वर्षाची बचत बाहेर काढा आणि बेड, लसीकरणासाठी वापरा. राज्याची आर्थिक स्थिती सांभाळायला ५ वर्षे लागतील", अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.