सुमारे १ लाख भूमिपुत्रांचा आज सिडकोला घेराव मोर्चा
बेलापूर: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आज (२४ जून) सिडकोला घेराव घालणार आहेत. अशातच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबईला छावणीचं स्वरुप आलं आहे. नवी मुंबई, पनवेल मुंबई, पुणे, ठाणे, पालघर येथून सुमारे 5 हजार पोलीस अधिकारी, कर्मचारी सिडको कार्यालयाच्या परिसरात दाखल झाले आहेत. राज्य राखीव दलाच्या 7 तुकड्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्या आहेत. दंगल नियंत्रण पोलीस पथकदेखील दाखल झाले आहे. रायगड, ठाणे, पालघर, जिल्ह्यतील जवळपास 1 लाख प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आजच्या घेराव आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकाऱ्यांना रोखण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (1 Lakh Local People of Navi Mumbai to protest agitate against Thackeray govt cidco office Police force CRPF force deployed)
विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. तर नवी मुंबईचे स्थानिक नेते दि बा पाटील यांचेच नाव या विमानतळाला देण्यात यावे यासाठी स्थानिक नेते आणि ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. १० जूनला विविध ठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनानंतरही या विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न सुटलेला नसल्याने आज सिडको कार्यालयाला घेराव घालण्यात येत आहे. या पार्श्वभूमवर बुधवारी नवी मुंबई परिसरातील 1 हजार प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलिसांनी बुधवार संध्याकाळपासूनच प्रकल्पग्रस्त नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांच्या माध्यमातून प्रत्येक गावाच्या मुख्य रस्त्यावर गावकाऱ्यांना रोखण्यात येणार आहे.
आंदोलकांना थोपवण्यासाठी पोलिसांची विशेष व्यूहरचना
सिडकोला घेराव आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष व्यूहरचना केली आहे. प्रत्येक स्पॉटवर 1 डीसीपी, 1 एसीपी, दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि प्रत्येक वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत 12 पोलीस कर्मचारी असणार आहेत. पोलीस आयुक्त, स्थानिक पोलीस उपायुक्त हे स्पॉटवर सतत फेरफटका मारत राहणार आहेत. नवी मुंबई महापालिका मुख्यालय, सायन पनवेल महामार्गावर खारघर, सायन पनवेल महामार्गावर उरण फाटा येथे पोलीस बंदोबस्तासह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रण दल तैनात करण्यात आले आहेत.
वाहतुकीत बदल
आंदोलनावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, याची खबरदारी घेऊन नवी मुंबईत अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसंच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आलेले आहेत. आज सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. तर ठाणे बेलापूर रस्त्याला हलकी वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळवली जाणार आहे. तर कोपरखैरणे ते सीबीडी, खारघर ते सीबीडी आणि नेरुळ ते सीबीडी अंतर्गत मार्ग राहणार पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच मुंबईतून पुण्याकडे जाणारी वाहतूक महापे शिळफाटा मार्गे पुण्याकडे जाईल. तर पुण्यावरून येणारी वाहतूक तळोजा, मुंब्रा, महापे मार्गे मुंबईत येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.