नवी मुंबई : नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिक सावजीभाई मंजेरी (५६) यांच्या हत्या प्रकरणात अटक केलेले मारेकरी कौशलकुमार यादव (१८) आणि सोनूकुमार यादव (२३) या दोघा सख्ख्या भावांनी त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे हत्येची सुपारी घेतल्याचे तपासात उघड झाले आहे.
हत्या करण्यासाठी त्यांना १० लाख रुपये मिळणार होते. त्यापैकी फक्त १ लाख रुपयेच त्यांना मिळाले होते. उर्वरित रक्कम सावजीभाई यांच्या हत्येनंतर मिळणार होती. मात्र सुपारी देणारे व यात मध्यस्थी असलेल्या सर्वांनीच आपले मोबाईल फोन बंद केल्याने त्यांना रक्कम मिळाली नाही. त्यातच पोलिसांनी या हत्या प्रकरणाचा छडा लावत दोघांना अटक केली.
कौशलकुमार यादव आणि सोनूकुमार यादव हे अत्यंत गरिबीतून आले आहेत. त्यांचे पालक बिहार येथील मूळ गावी शेती करून उदरनिर्वाह चालवतात. त्यांना आणखी दोन मोठे भाऊ आणि एक बहीण आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यादव बंधूंचे मूळगावी आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे.
गरिबीमुळे त्यांनी आठवीतच शाळा सोडली. त्यानंतर त्यांनी गावामध्येच वेगवेगळ्या प्रकारची आणि शेतीची कामेही केली आहेत. मात्र, त्यांना गावात नेहमी कामधंदा मिळत नसल्याने वर्षभरापूर्वी ते मुंबईत वांद्रे येथे आले होते.
त्याठिकाणी ते बिहारमधील राहुल नावाच्या गवंडीच्या हाताखाली रोजंदारीवर काम करत होते. या राहुलनेच कॉन्ट्रक्ट किलिंगसाठी त्यांना संपर्क साधला होता. कौशलकुमार आणि सोनूकुमार यांनी गरिबीतून बाहेर पडण्यासाठी सावजीभाई यांच्या हत्येची सुपारी स्वीकारल्याचे चौकशीतून उघड झाले आहे.
या कॉन्ट्रक्ट किलिंगमध्ये मध्यस्थी असलेला आणि वेल्डिंगचे काम करणाऱ्या रफिक नावाच्या व्यक्तीने राहुलकडे हत्येची योजना राबवण्यासाठी संपर्क साधला होता. गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल राहुलनेच यादव बंधूंना पुरवले होते. त्यामुळे राहुलला अटक केल्यानंतर हे पिस्तूल त्याने कोठून आणले, याची माहिती मिळेल, असे संबंधित पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
गौरवकुमार यादव (२४) याने सावजीभाई यांच्यावर गोळीबार करण्यापूर्वी रेकी केली होती. यादव बंधूंच्या अटकेनंतर अद्यापपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणीही पोलिसांकडे संपर्क साधलेला नाही किंवा त्यांच्यापैकी कुणीही जामिन प्रक्रियेसाठी अथवा त्यांच्या चौकशीसाठी आलेले नाहीत, असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना ३० मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
प्रशिक्षणाशिवाय गोळीबार
योग्य प्रशिक्षण घेतल्यानंतरही अनेकदा पोलिसही पिस्तूल हाताळण्यात तज्ज्ञ होत नाहीत. मात्र, कौशलकुमारने कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय एका सराईत गुन्हेगाराप्रमाणे पिस्तूल चालवल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. बिहारमध्ये लग्नाच्या मिरवणुकीत हवेत बंदुकीतून गोळीबार करणे हा नियम असल्याचे आणि त्यातूनच बंदूक, पिस्तूल हाताळण्याची माहिती मिळाल्याचे यादव बंधूंच्या चौकशीतून पुढे आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.