Navi Mumbai: पनवेल मधील क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याचा नवी मुंबई पोलिसांच्या निर्णयाविरोधात राज्याच्या गृहविभागाकडे अपील दाखल करणाऱया बार मालकाचा अपील राज्याच्या गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी फेटाळुन लावला आहे. तसेच नवी मुंबई पोलिसांनी सदर ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून ऑर्केस्ट्रा बार चालविणाऱया नवी मुंबईतील बार मालक चालकांचे धाबे दणाणले आहेत.
ऑर्केस्ट्राच्या नावाखाली छुपे डान्सबार चालवत असलेल्या नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारवर नवी मुंबई पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अचानक छापा मारुन या बारची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार नवी मुंबई पोलिसांनी गत ऑगस्ट महिन्यामध्ये पनवेल मधील क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड बारची तपासणी केली होती. या तपासणी दरम्यान सदर ऑर्केस्ट्रा बारने त्यांना दिलेल्या परवान्याचे व नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर सदर ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
त्यानंतर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी घेतलेल्या सुनावणीत क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड ऑर्केस्ट्रा बारकडून नियमांचे व अटींचे उल्लंघन झाल्याची खात्री झाल्यानंतर 30 ऑक्टोबर 2023 रोजी सदर बारचा ऑर्केस्ट्रा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यानंतर या बार मालकाने पोलिसांच्या निर्णयाविरोधात राज्याच्या गृह विभागाकडे अपील दाखल केले होते.
या अपलीवर गत 6 डिसेंबर रोजी सुनावणी झाली असता, गृह विभागाच्या प्रधान सचिवांनी बार मालकाचा अपील फेटाळून लावला. तसेच नवी मुंबई पोलिसांनी क्रेझी बॉईज रेस्टॉरंट अँड ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द करण्याचा घेतलेला निर्णय कायम ठेवला. या पुढील काळात परवान्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱया इतर ऑर्केस्ट्रा बारवर देखील कडक कारवाई करण्यात येईल, असे नवी मुंबई पोलिसांकडुन स्पष्ट करण्यात आले आहे.
नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमध्ये अश्लील नाच-गाण्यांचा उच्छाद
नवी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बार फक्त गाण्यांपुरतेच मर्यादित न राहता त्यात अश्लील नाच-गाण्यांचा व नोटा उडवण्याचे प्रकार होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेक बार विहीत वेळेपेक्षा अधिक वेळ चालविण्यात येत असल्याचे तसेच बारचे प्रवेशद्वार बाहेरुन बंद असले तरी बारच्या आतमध्ये बिनबोभाटपणे महिला वेटर्सचे अश्लिल चाळे सुरु असल्याचे पोलिसांनी वेळोवेळी केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे.
नवी मुंबईतील अनेक ऑर्केस्ट्रा बारमध्ये नियम धाब्यावर बसवून ते बिनबोभाट चालविण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याने नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आपापल्या हद्दीतील बारची तपासणी करुन त्यात गैरप्रकार होत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.