"ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा, अशी ऑफर"

राणा दाम्पत्याचं आंदोलन आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडींनी राजकारण ढवळून निघालं आहे.
Sanjay Raut
Sanjay Raute sakal
Updated on

गेल्या तीन दिवसांपासून शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा खेळ मुंबईत रंगला आहे. याची राज्यभरात चर्चा आहे. त्या अनुषंगाने घडणाऱ्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातलं वातावरण चांगलंच तापलंय. या सगळ्या प्रकरणावरून शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून भाजपा आणि राणा दाम्पत्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा अशी ऑफर सध्या बाजारात आलेली दिसते अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

नवनीत आणि रवी राणा या दाम्पत्यावर टीका करताना सामनात म्हटलं आहे, "अमरावतीचं राणा दाम्पत्य, अनुक्रमे खासदार आणि आमदार आहेत. ते कधी कोणत्या पक्षात असतील व कोणता झेंडा खांद्यावर घेतील याचा भरवसा नाही. श्रीरामाचे नाव घेण्यास राणाबाईंचा विरोध होता. संसदेत श्रीरामाच्या नावाने शपथ घेणाऱ्यांना या बाईने विरोध केला होता. त्याच बाई आज हनुमान चालिसा वगैरे विषयांवर हिंदुत्वाची पिपाणी वाजवतात आणि समस्त भाजपा नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे आश्चर्यच आहे. मुंबईत येऊन हनुमान चालिसाचा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर करायचाच होता तर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, पंतप्रधान मोदींचे निवासस्थान, केंद्रीय गृहमंत्र्यांचे दालन अशा ठिकाणी करायला हवे".

भाजपाची मळमळ बाहेर पडली...

"राणा दाम्पत्यास अटक केल्यानंतर भाजपची मळमळ बाहेर पडली. जणू काही राणी चेन्नम्मा, झाशीच्या राणीवरच कारवाई झाली अशा आविर्भावात हे सगळे लोक पोलीस ठाण्यात धावले व पोलीस ठाण्याच्या पायरीवर बसून छाती पिटू लागले. काँग्रेसमध्ये असताना ‘ईडी’च्या भयाने जे शेपटय़ा आत घालून भाजपचे गुलाम झाले असे लोक शिवसेनेला आव्हान देत आहेत. राणा दाम्पत्याचे गुन्हे हे फसवाफसवी व अफरातफरीचे आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळय़ातील आरोपी किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेले तेव्हा संतप्त लोकांनी त्यांच्यावर चपला व दगड फेकले. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असे भाजपवाले म्हणत असतील तर ते एकप्रकारे चोर, लफंग्यांचे समर्थन करीत आहेत. खरा विनोद पुढेच आहे. आयएनएस विक्रांतप्रकरणी पैशांचा अपहार करणाऱ्या आरोपीला केंद्राने विशेष सुरक्षा कवच दिले आहे. बनावट जात प्रमाणपत्राद्वारे लोकसभेत गेलेल्या नवनीत कौर राणांसाठीदेखील केंद्राने अलगद सुरक्षा कवच दिले आहे. ‘ठाकरे सरकारविरुद्ध बेताल बोला व केंद्राची सुरक्षा मिळवा’,अशी ‘ऑफर’ बाजारात आलेली दिसते. अशाने कायद्याचे राज्य कोसळून पडेल", अशी टीका 'सामना'तून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.