विधानसभेच्या निवडणुका घोषित होऊन आठवडा उलटत नाही तोच, मुरबाड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. यातच माजी आमदार गोटीराम पवार यांचे पुत्र सुभाष पवारही मुरबाडच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
मात्र आता आयात उमेदवाराला संधी देऊ नये, तसे झाल्यास अश्या आयात उमेदवाराला मतदारसंघात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनेरे यांनी दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात मुरबाडच्या उमेदवारीवरून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला आहे.