BMC चा निर्णय; दररोज 30 हजार चाचण्यांमध्ये फक्त 2 टक्के पॉझिटिव्ह
मुंबई: शहरात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात येत असली तरी ती अजूनही पूर्णपणे कमी झालेली नाही. दुसऱ्या लाटेचं शेपूट अजूनही मुंबईत बाकी आहे. त्यातही ऑगस्टमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे. या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी पालिकेने बेडपासून इतर आरोग्य सुविधांपर्यंत योजना आखण्यास सुरुवात केली आहे. तिसऱ्या लाटेसाठी पालिकेने 8 हजार खाटांचे नियोजन केले आहे. तर, सध्या सुरू असलेल्या जंबो कोविड केंद्रांमधील जवळपास 70 ते 80 टक्के बेड्स रिक्त आहेत. त्यामुळे, सध्या सुरू असलेल्या जंबो कोविड सेंटरमधील 60 टक्के बेड भरल्यानंतरच पालिका नवीन जंबो कोविड सेंटर कार्यान्वित करणार असल्याचं स्पष्ट झाले आहे. (New Jumbo Covid Center will start after filling 60 percent beds of its capacity)
मुंबईत फेब्रुवारीच्या दुसर्या आठवड्यात कोरोनाच्या दुसर्या लाटेला सुरूवात झाली. आता त्यावर नियंत्रण आलेले दिसते. मात्र, अजूनही दुसरी लाट संपुष्टात आलेली नाही. शिवाय, सध्या रुग्णसंख्येचा आलेख स्थिर असला तरी तो कमी झालेला दिसत नाही. लोकांचा निष्काळजीपणा तिसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरु शकतो असे मत आधीच टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, काही दिवसांपासून पुन्हा पॉझिटिव्हीटी दर वाढला असून दररोज सरासरी 30 हजार लोकांची कोरोना चाचणी केली जाते, त्यामध्ये 2 टक्के लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळत आहेत. वाढणारा पॉझिटिव्ह दर ही एक चिंतेची बाब असल्याचं मत राज्य टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले आहे. पण, हा पॉझिटिव्ही दर आधीपेक्षा 8 ते 9 टक्क्यांनी कमी झाला आहे असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवाय, तो किमान 1 टक्क्यांपर्यंत कमी झाला पाहिजे आणि यासाठी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहनही डॉ. सुपे यांनी केले आहे.
एवढ्या बेड्सची तयारी-
परिस्थिती जरी नियंत्रणात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेच्या कोणत्याही परिस्थितीसाठी पालिका सज्ज होत आहे. म्हणूनच, आरोग्य यंत्रणा बळकट केली जात आहे. मालाड, कांजूरमार्ग, महालक्ष्मी रेसकोर्स आणि सायन येथील नवीन जंबो केंद्रांतून पालिकेला 5500 बेड उपलब्ध होणार आहे आणि त्यामध्ये 80 टक्के बेड ऑक्सिजनयुक्त असतील. सध्या गोरेगावमधील नेस्को, अंधेरीतील सेव्हन हिल्स, वरळीतील एनएससीआय आणि भायखळामधील जंबो कोविड केंद्र कार्यरत आहेत. गोरेगाव नेस्को जंबो केंद्रात सद्यस्थितीत फक्त 136 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर. इतर कोविड केअर सेंटरमध्ये फक्त 10 टक्के बेडच भरलेले आहेत.
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, सध्या कार्यरत जंबो केंद्रांतील 60 टक्के बेड्स भरतील तेव्हाच नवीन जंबो केंद्रांव्यतिरिक्त वांद्रे बीकेसी, दहिसर आणि मुलुंड जंबो केंद्रही टप्प्याटप्प्याने कार्यान्वित होतील. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि त्यातून बेड्स रिक्त असल्याचे चित्र आहे. नागरिकांनी काळजी घेतल्यास लाट नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
60% आयसीयू-व्हेंटिलेटर रिक्त-
पालिकेच्या डॅश बोर्डच्या आकडेवारीनुसार, 2401 आयसीयू बेड्सपैकी 1315 बेड रिक्त आहेत. तर, 1309 व्हेंटिलेटर बेडपैकी 699 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहेत. त्याचप्रमाणे, 9292 ऑक्सिजन बेड्सपैकी 7785 बेड रिक्त आहेत.
(संपादन- विराज भागवत)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.