नवी मुंबई : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडून योजनाबद्ध कारभार केला जात नसल्याने थकीत मालमत्ता कराचे प्रमाण वाढले आहे. माहिती अधिकारात ही बाब समोर आली आहे. आरटीआय कार्यकर्ते सुधीर पाटील यांनी केलेल्या अर्जाला मालमत्ता कर विभागाकडून याबाबत माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे गेल्या पाच वर्षांत एकूण मालमत्ता करापैकी केवळ २० ते २५ टक्के कर वसूल करण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे शहरातील विकासकामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
मालमत्ता कर वसुली करण्यात पालिका प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या कराचे आकडे मोठे होताना दिसत आहेत. २०१६-१७ या आर्थिक वर्षात १९६२ कोटी आठ लाख ५५ हजार रुपये इतका मालमत्ता कर जमा होणे अपेक्षित होते; मात्र या कालावधीत प्रत्यक्ष ६४४ कोटी ५४ लाख रुपये इतका कर वसूल करण्यात आला. २०१७-१८ मध्ये २१२२ कोटी ७९ लाख ४६ हजार रुपये इतका मालमत्ता कर जमा होणे अपेक्षित होते; मात्र त्यापैकी केवळ ५३५ कोटी ५ लाख रुपये कर वसूल करण्यात पालिकेला यश आले. २०१८-१९ मध्ये २२२९ कोटी ६७ लाख ४१ हजार रुपये मालमत्ता कर अपेक्षित होता; मात्र प्रत्यक्षात ४९१ कोटी ७६ लाख रुपये जमा झाले; तर २०१९-२० या आर्थिक वर्षात २५९५ कोटी ४९ लाख ५५ हजार रुपये मालमत्ता कर शिल्लक होता; मात्र आर्थिक वर्ष संपण्यास दोन महिने शिल्लक असताना प्रत्यक्षात ४०५ कोटी रुपये जमा करण्यात पालिकेला यश आले. या ४०५ कोटींमध्ये अभय योजनेद्वारे जमा झालेल्या ६९.६२ कोटी रुपयांच्या कराचा अंतर्भाव आहे. याचा शहरातील विकासकामांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
सध्या हजारो कोटींची वसुली थकित आहे. यामागे मालमत्ता कर विभाग जबाबदार असून, त्यातील अनागोंदी कारभाराबाबत करदाते नाराज आहेत. याचा परिणाम महसुलावर झाला असून, अपेक्षित कर जमा करण्यात पालिकेला अपयश आले आहे.
- सुधीर पाटील, आरटीआय कार्यकर्ते.
आरटीआय कार्यकर्ते सुधीर पाटील यांच्या माहितीची दखल घेतली असून, लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाईल.
- अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.