नवी मुंबई : विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना नवी मुंबईत भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीचा बाल्लेकिल्ला मानला जाणाऱ्या नवी मुंबईत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते गणेश नाईक यांचे सुपुत्र संदीप नाईक यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश केल्यानंतर आता भाजपमधील संघटनात्मक बदलांना वेग आला आहे.
नवी मुंबईतील वाशी येथे बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडल्यानंतर नवी मुंबईच्या भाजप जिल्हाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी सुरु आहे. यासाठीच बेलापूर येथे कोअर कमिटीची मिटिंग पार पडली. तुर्भे गावात देखील एक मिटिंग पार पडली. यांसारख्या इतरही बैठकांना आता जोर आला असताना भाजपमधील अंतर्गत बदलांवर सध्या अधिक भर असून जिल्हाध्यक्ष नवीन नेमला जाणार असल्याने जुनाच कार्यकर्ता या पदावर हवा यासाठी धडपड सुरु आहे.
जिल्हाध्यक्ष पदाच्या इच्छुकांमध्ये डॉ. राजेश पाटील, शिवसेनेच्या नेत्याच्या विश्वासातील नगरसेवक दीपक पवार ,संघात कार्यरत असलेले नमोचे संस्थापक सतीश निकम, आदींचा समावेश आहे. या शर्यतीत जिल्हा कार्यकारिणीवरील नितीन कंधारी यांचे नाव आघाडीवर घेतले जात आहे. मात्र त्यांच्या आणि अध्यक्षपदामध्ये चक्क पाकिस्तान आडवे येत असल्याची चर्चा आहे. हो ! कारण कंधारी यांच्या पत्नी या पाकिस्तानच्या आहेत अश्या चर्चांना आता उधाण आलं असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याच संदर्भात नितीन कंधारी यांच्याशी आम्ही संवाद साधला यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
माझी बायको पाकिस्तानी नाही तर अफगाणी-नितीन कंधारी
माझी बायको पाकिस्तानी नाही तर अफगाणी आहे. मला बदनाम करण्याचे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी भारतीय नागरीकत्वासाठी अर्जही केला आहे. यावर स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की, जिल्हाअध्यक्ष पद हे माझ्या बायकोला नव्हे तर मला हवं आहे. मग विरोधकांना रणकदंन करायची गरज काय ? असा सवालही त्यांनी केला आहे.
कंधारी हे पेशाने व्यावसायिक असले तरी ते नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी आग्रही आहेत. मात्र त्यांच्या पत्नीस अजूनही भारताचे नागरिकत्व मिळत नसल्याने त्यांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यांच्या पत्नीच्या नागरिकत्वाची फाईल सध्या केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांकडे आहे. या फायलींवर योग्य शेरा आल्याशिवाय पुढील प्रक्रिया होऊ शकणार नाही. पक्षातच अडचण असल्याने नवी मुंबई शहरातील भाजपची डोकेदुखी वाढली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.