Ekanth Shinde: उबाठा अन् एमआयएममध्ये फरक नाहीच; एकनाथ शिंदे यांची दसरा मेळाव्यात टीका

Latest Shivsena Dasra Melava News: धारावीकरांनी चिखलातच राहायचे का, असा प्रश्नही त्यांनी केला. दोन लाख १० हजार धारावीकरांना आम्ही घरे देऊ, पूर्वीच्या करारात असे नव्हते,’ असेही शिंदे यांना सांगितले.
Ekanth Shinde
Ekanth Shinde sakal
Updated on

MumBAI: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी शिवसेनेचा भगवा रंग यांनी पार बदलवला असून आता उबाठा आणि एमआयएममध्ये फरकच उरला नाही, अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केली.

‘पाकिस्तानचे झेंडे तुमच्या मोर्च्यात नाचवले, बॉम्बस्फोटातील आरोपी इक्बाल मुसा हा तुमच्या प्रचारात आला, याकुब मेमनच्या मजारीचे उदात्तीकरण करण्याची आगळीक करणारे दिल्लीतील गल्लीगल्लीत मला मुख्यमंत्री करा म्हणून फिरताहेत; पण ज्यांचे मित्र त्यांना हे पद द्यायला तयार नाहीत, तिथे जनता जनार्दन यांना या पदासाठी निवडून देईल काय,’ असा प्रश्नही त्यांनी केला.

‘महाविकास आघाडी सरकार सत्तेत राहिले असते तर मोरू सकाळी उठला अन् रात्री झोपला एवढेच म्हणावे लागले असते,’ असे सांगत, ‘हिऱ्याच्या पोटी गारगोटी जन्मली,’ असे उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. टेंडर तेथे सरेंडर असे शेलके शब्द वापरत ते म्हणाले, ‘महाराष्ट्रातील मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड या सर्व प्रकल्पांना मविआने ब्रेक लावला. नव्हता ब्रोकर तेथे लागला ब्रेकर असे होते. स्वत: बंगल्यांवर बंगले बांधणार, धारावीकरांनी चिखलातच राहायचे का, असा प्रश्नही त्यांनी केला. दोन लाख १० हजार धारावीकरांना आम्ही घरे देऊ, पूर्वीच्या करारात असे नव्हते,’ असेही शिंदे यांना सांगितले.

‘जनतेच्या प्रश्नांशी कोणतेही देणे-घेणे नसलेल्यांपासून शिवसेना वाचवण्याचे काम आपण केले,’ असा दावा करत ते म्हणाले, ‘हा आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. त्यांचे फेक नॅरेटिव्ह तर आपला कार्यक्रम करेक्टिव्ह. गेल्या दोन वर्षांत महायुती सरकारने नेत्रदीपक कामगिरी केली. प्रकल्प सुरू होऊन पूर्णत्वाला गेले. महाराष्ट्र क्रमांक तीनवरून क्रमांक एकवर गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राममंदिर,कलम ३७० रद्द करणे ही बाळासाहेबांची स्वप्ने प्रत्यक्षात आणली.’ आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीला मत द्या, असे आवाहन करत ते म्हणाले, ‘हरयाणाप्रमाणेच महाराष्ट्रात घडेल.’

शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्याचे भाषण उद्धव ठाकरे यांच्यावर टीका आणि सरकारच्या कामगिरीची माहिती अशा दोन आधारांवर गुंफले होते. ‘त्यांचा परिवार वाद तर आपला महाराष्ट्रवाद’, ‘त्यांचे फेक नॅरेटिव्ह तर आपला कार्यक्रम करेक्टिव्ह’ अशा वेगवेगळ्या शब्दांची गुंफण करत शिंदे यांनी गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राने केलेल्या विकासाची जंत्री सांगितली. समाजांसाठी महामंडळे करून प्रगती साधू, असे सांगत ते म्हणाले, ‘१० लाख बेरोजगारांना शिष्यवृत्ती, वृद्धांना वयोश्री योजना घोषित केली, तेच आमचा प्रचार करतील.’ लाडक्या बहिणी या सरकारच्या ब्रँडॲम्बेसेडर असल्याचे नमूद करत ते म्हणाले, ‘मेट्रो तीन प्रकल्प रखडल्यामुळे १७,००० कोटींचा अतिरिक्त खर्च झाला. नुकसान झाले. हे झाले नसते तर मी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ दीड हजार नाही, तर तीन हजार रुपयांचे अनुदान दिले असते.’

...

मला हलक्यात घेऊ नका!

विरोधक दाढीवर टीका करतात, तो संदर्भ देत एकनाथ शिंदे म्हणाले, ‘होती दाढी... म्हणून उद्ध्वस्त केली महाविकास आघाडी... प्रगतिपथावर आणली महाराष्ट्राची गाडी!’ ‘मला हलक्यात घेऊ नका,’ असे सांगून ते म्हणाले, ‘महाराष्ट्राला प्रगतिपथावर अग्रेसर ठेवण्यासाठी आपण उठाव केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते. एखाद्या शिवसैनिकाला त्या पालखीत बसवून त्याला पुढे नेण्याऐवजी हे स्वतःच मुख्यमंत्री झाले. कारण त्यामागचे हेतू स्पष्ट होते. आज तीच अवस्था राहिली असती, तर महाराष्ट्रातला दसरा वेगळाच राहिला असता.’ गेल्या काही दिवसांत साधलेला विकासाची माहिती देताना ते म्हणाले, ‘सकाळ-संध्याकाळ फेसबुक लाइव्ह करून घरी बसणारा मुख्यमंत्री मी नाही. मी जनतेच्या दारी जाणारा मुख्यमंत्री आहे. कोविड काळामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात काम झाले नाही, अशी कारणे सारखी देऊ नयेत. त्या काळातील अपयश झाकण्याचा प्रयत्न आता जनतेला नकोसा झाला आहे. खरे कोण आणि खोटे कोण, हे जनता जनार्दनाच्या दरबारात ठरत असते. लोकसभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्या स्ट्राइक रेटपेक्षा आपल्या शिवसेनेचा स्ट्राइक रेट जास्त होता. आपणच खरी शिवसेना आहोत. आपणच धनुष्यबाणाचे धनी आहोत.’

...

शिवाजी पार्कपेक्षा चौपट गर्दी

आझाद मैदानावर झालेल्या या मेळाव्याला महाराष्ट्रातून शिवसैनिकांनी हजेरी लावली होती. शिवसैनिकांत मोठा उत्साह दिसत होता. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, आझाद मैदानावर शिवाजी पार्कवरील गर्दीपेक्षा चौपट अधिक गर्दी जमली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.