कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरामधील घनकचरा व्यवस्थापनातील काही प्रकल्प मार्गी लागले आहेत. पालिका क्षेत्रात 5 बायोगॅस प्रकल्प सुरूही झाले आहेत; मात्र यानंतरही आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना सुरू करण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. प्लास्टिकपासून "पॉलिफ्युएल' बनवण्याच्या प्रकल्पाची सुरुवात बारावे येथे करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील प्लास्टिक समस्येवर अंशतः उतारा मिळणार असला, तरी घनकचरा व्यवस्थापनाची परिस्थिती "जैसे थे'च आहे.
"रुद्र इन्व्हरमेंटल सोल्युशन' या संस्थेच्या सहकार्याने पालिकेने बारावे येथे प्लास्टिकपासून फर्नेस ऑईल बनवण्याच्या प्रकल्पाची तयारी केली आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या प्रकल्पाचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे. एक हजार स्क्वेअर मीटर जागेत हा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. यासाठी पालिका दररोज एक टन इतका प्लास्टिकचा कचरा संस्थेला देणार आहे.
शहरात दररोज तयार होणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्यापैकी काही भाग या प्रकल्पासाठी वापरला जाणार असून काही भाग रस्त्याच्या डांबरीकरणाच्या प्रक्रियेतही वापरला जाणार आहे. यामुळे शहरातील प्लास्टिकच्या कचऱ्याची काही प्रमाणात विल्हेवाट लागणार आहे; मात्र इतर कचऱ्याची व्यवस्था करण्यात पालिकेस म्हणावे तितके यश मिळालेले नाही.
पालिकेने चार प्रभाग क्षेत्रांमध्ये खासगी ठेकेदारामार्फत कचरा उचलण्याची प्रक्रिया सुरू केली आहे; परंतु अद्यापही ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याने शहरात सुरू करण्यात आलेल्या पाच बायोगॅस प्रकल्पांना पुरेसा कचरा मिळत नसल्याचे वास्तव आहे. याबाबत पालिकेने जनजागृती केल्यानंतरही ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण होत नाही.
खासगी ठेकेदारांमार्फत गोळा करण्यात येणारा कचरा वर्गीकरण करून गोळा केला जाईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले होते; परंतु त्यात यश मिळत नसल्याचे चित्र आहे. याबाबत पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे दिसते.
बायोगॅस प्रकल्प अधांतरी!
उंबर्डे, बारावे, कचोरे, आयरे रोड आणि राजू नगर येथे पालिकेने बायोगॅस प्रकल्प सुरू केले आहेत. या प्रकल्पांची क्षमता प्रत्येकी दहा टन इतकी आहे; मात्र या प्रकल्पांसाठी पुरेसा ओला कचरा उपलब्ध होत नसल्याने हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवणे शक्य होत नाही. मांडा-टिटवाळा येथील बायोगॅस प्रकल्पासाठी पर्यावरण विभागाची मंजुरी अपेक्षित आहे. त्यानंतर सहावा प्रकल्प सुरू होईल; मात्र ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे गोळा करण्यात असलेल्या अडचणीमुळे हे प्रकल्प भविष्यात पूर्ण क्षमतेने चालवले जातील, याची कोणतीही शाश्वती नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.