मुंबई : राज्यातील शिक्षकांना 250 अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवण्यात येते. यात केंद्र सरकारपासून ते जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सर्व कामांचा समावेश आहे. ही कामे आता आम्ही टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत, असे आश्वासन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. यामुळे राज्यातील शिक्षक व मुख्याध्यापकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने रविवारी (ता. 19) सायन येथे मुख्याध्यापक भवनात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा सन्मान सोहळ्यात सत्कार करण्यात आला, या वेळी त्या बोलत होत्या. "शिक्षणमंत्री होऊन मला 15 दिवस झाले आहेत, पण मी स्वत: शिक्षिका असल्याने मला शाळा-मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न माहिती आहेत. शैक्षणिक प्रश्नांवर मुख्याध्यापक संघटनेच्या प्रतिनिधींना घेऊन चर्चा करणार आहोत. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा सुरू असून तो प्रश्नही लवकरच मार्गी लावू' असे गायकवाड म्हणाल्या.
हेही वाचा - मुंबईतील 70 सराफ जीएसटी विभागाच्या रडावर
शिक्षकांचे प्रश्न चर्चेतून सोडवावेत, अशी अपेक्षाही या वेळी त्यांनी व्यक्त केली. या वेळी बृहन्मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष शंकर पवार, दिलशाद थोबानी, सचिव प्रशांत रेडीज यांच्या हस्ते खासदार एकनाथ गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबई विभागाचे सहायक शिक्षण उपसंचालक भास्करराव बाबर व महाराष्ट्र मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष विजयसिंह गायकवाड यांना सन्मानित करण्यात आले. मुंबई मुख्याध्यापक संघटनेच्या वतीने माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते मुंबई विभागातील प्रत्येक वॉर्डमधील एक गुणवंत मुख्याध्यापक अशा 17 उत्तम शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक, सेवानिवृत्त सदस्य, माजी अध्यक्ष, राज्य पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक व इतर बिगरराजकीय संस्थाचालक, शिक्षक संघटनांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.