मुंबई : मुंबईतील वाढता कोरोना संसर्गाचा प्रसार लक्षात घेत पालिकेने टेस्ट लॅब वाढवण्यावर भर दिला आहे. पश्चिम उपनगरात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता महानगरपालिकेने कुपर रुग्णालयातही कोरोना चाचणीला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला असून येत्या दोन दिवसांत कोरोना चाचणी करण्यासाठी लॅब सुरू होणार आहे. या लॅबमध्ये दिवसाला सुमारे 100 चाचण्या करता येणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील कोरोनाचा संशय असलेल्या सर्वसामान्य रुग्णांना मोफत चाचणी करणे शक्य होणार आहे.
कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात कोरोनाचा संशय असल्यास डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय पालिका आणि खासगी लॅबमध्ये चाचणी करणे, पालिका रुग्णालयांमध्ये रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर हे महत्त्वाचे निर्णय आहेत. त्याचबरोबर आता विलेपार्ले येथील कुपर रुग्णालयात कोरोना लॅब सुरू करण्यात येणार आहे. कुपरमध्ये कोरोना लॅब सुरू केल्यामुळे पश्चिम उपनगरांमधील खासगी रुग्णालयांवर पडणारा ताणही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांतील कोरोना चाचणीचा खर्च न परवडणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पश्चिम उपनगरात कोरोना संसर्ग वेगाने पसरत असल्याने पालिकेच्या कूपर रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांची गर्दी होते. कुपरमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांच्या कोरोना चाचणीचे नमुने तपासणीसाठी तिथे व्यवस्था नव्हती त्यामुळे तेथील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा, केईएम, हाफकीन किंवा शीव रुग्णालयात पाठवले जात होते. मात्र, कुपरमधील लॅब सुरू झाल्यावर वेळ वाचणार आहेच पण कोरोनाचे जलद निदान आणि जलद उपचार शक्य होणार आहेत.
पश्चिम उपनगरांतील प्रत्येक वॉर्ड मध्ये कोरोना बधितांचा आकडा मोठा आहे. आर मध्य बोरिवली -4410,आर दक्षिण कांदिवली - 3472,आर उत्तर दहिसर - 2023, एच पूर्व सांताक्रूज - 3669, के पश्चिम अंधेरी, जोगेश्वरी,विलेपार्ले - 5121, पी उत्तर मालाड - 5382,पी दक्षिण गोरेगाव 3472 वर रुग्णसंख्या पोचली आहे.
पालिकेने या परिसरात अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला आहे. पश्चिम उपनगरांत विशेष करून आर/मध्य, आर/दक्षिण आणि आर-मध्यमध्ये 15 मिनिटांत कोरोनाचे निदान करणाऱ्या अँटिजेन चाचणी सुरू आहेत. त्यामुळे रुग्णांची योग्य ती आकडेवारी समजणे आणि त्यावर जलद औषधोपचार करणे शक्य होणार आहे. रूग्णालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून कुपरमधील स्वतंत्र व्यवस्थेमुळे रुग्णांना एकाच वेळी दुहेरी फायदा होणार असल्याची माहिती रुग्णालयाचे डिन डॉ पिनाकीन गुज्जर यांनी दिली.
--------------------------------------
(संपादन - तुषार सोनवणे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.