... तर आज एसटी ठरली असती वरदान; मालहवाहतूक योजना बारगळली!

... तर आज एसटी ठरली असती वरदान; मालहवाहतूक योजना बारगळली!
Updated on

मुंबई : रेल्वेच्या धर्तीवर एसटीद्वारे रेशन धान्य, पोषण आहार, धान्यांसह इतर जीवनावश्यक वस्तूंची मालवाहतूक करण्याची घोषणा तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली होती. यात जुन्या बसचे मालवाहू गाड्यांमध्ये रुपांतर करण्यात येत असल्याने परिवहन विभागाने त्यास मान्यता नाकारली; मात्र आज ही योजना अंमलात आली असती तर, लाॅकडाऊनच्या काळात एसटीची मालवाहतूक सेवा प्रभावी ठरली असती, असे एसटीतील तज्ज्ञांचे मत आहे. 

एसटीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मालवाहतूक सेवा आणि गोदामांच्या व्यवसायात महामंडळ उतरणार होते. त्याचबरोबर लोकांना विविध सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करुन देण्याचा एसटीचा दृष्टीकोण होता. त्याचाच भाग म्हणून नविन मालवाहतूक ट्रक येईपर्यंत जुन्या बसचे ट्रक मध्ये रूपांतर करून मालवाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर 301 गोदामांची निर्मिती करण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी सह्याद्री राज्य अतिथीगृहावर सादरीकरण करण्यात आले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा यावर चर्चा करण्यात आल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले होते. 
प्रवासी वाहतुकीबरोबरच मालवाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद असल्याने त्याचा वापर करण्याचा निर्णय रावते यांनी घेतला होता; मात्र या घोषणेला एक वर्षांहून अधिक वेळ झाला असतानाही अद्याप ही योजनाच अंमलात आली नाही. या योजनेमध्ये एसटीने नविन ट्रॅक घेऊन मालवाहतूक सुरू केली असती, तर आज रेल्वे प्रमाणे एसटीला सुद्धा मालवाहतूकीच्या माध्यमातून भरघोस उत्पन्न कमवता आले असते. तसेच, राज्य शासनासाठीसुद्धा ही प्रभावी मालवाहतूक सेवा ठरली असती.
------------------
स्वतंत्र वाहनांची आवश्यकता
एसटीच्या जुन्या बसचे रुपांतर मालवाहतूक गाड्यात करण्याचा एसटीचा प्रयत्न होता; मात्र, याला परिवहन विभागाने चपराक लगावली. तत्कालीन परिवहन आयुक्तांनीच अशा वाहनांना परवानगी देता येणार नसल्याचा शेरा त्यावेळी मारला होता. एसटीच्या मालवाहतूकीसाठी स्वतंत्र नविन वाहनेच घ्यावी लागणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले होते.

लाॅकडाऊनमध्ये झाला असता फायदा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या खासगी वाहतूकीने जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक केली जात आहे. अशा स्थितीत एसटीची मालवाहतूक सुरू असती तर, शेतकऱ्यांचा कृषी माल, अन्नधान्य, भाजीपाला, फळे, व्यापारी माल, स्टेशनरी अशा सर्व प्रकारच्या मान्यताप्राप्त मालाची वाहतूक करता आली असती. विशेष करुन ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा माल शहरी बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याच्या कामी या सेवेचा वापर करता आला असता.
------------------
एसटीकडे मालवाहतूकीचा परवाना
परिवहन कायदा 1948 अंतर्गत एसटी महामंडळाची निर्मिती झाली आहे. त्यानूसार एसटी महामंडळाकडे प्रवासी आणि मालवाहतूकीचा सुद्धा परवाना आहे; मात्र अद्याप ना नफा ना तोटा तत्तावर एसटीची प्रवासी सेवा सुरू आहे. अद्याप माल वाहतूक सुरू केली नसल्याने एसटी महामंडळ दिवसेंदिवस तोट्यात जात आहे.
---------------


एसटीचा आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.  लाॅकडाऊन काळात एप्रिल अखेरपर्यंत सुमारे 1 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. त्यामूळे कोरोनाच्या सावटापुर्वीच यावर चर्चा सुरू होती; मात्र, कोरोनाचे संकट संपल्यानंतर यावर चर्चा करणार आहोत. त्यावेळी मालवाहतकीचे निकष तपासल्या जातील. त्यासाठी किती खर्च, फायदा अशा सर्व मुद्यांवर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.
- अॅड. अनिल परब, परिवहन मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.