श्रीगुरू पादुका उत्सवाच्या माध्यमातून आपण संत, सद्गुरू अशा सर्वांचे विचार, आचार प्रत्यक्ष स्वीकारतो आणि त्या मार्गावर चालण्यासाठी कृती करतो. पादुकांना नमस्कार केला म्हणजे सगळे झाले असे नाही, तर नमस्कार केल्यावर त्यांच्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार आपण करतो हा भाव महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील पादुका परंपरा निश्चितच नवयुगाला दिशा देणारी ठरेल.
— डॉ. सदानंद मोरे
भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये ईश्वर, संतांची मूर्तिपूजा करण्याची परपंरा पूर्वापार चालत आलेली आहे. मूर्तिपूजा एकाच ठिकाणी प्रतिष्ठापना करून केली जाते. अशावेळी आपल्याला संबंधित ईश्वर किंवा संतांची पूजा अन्यत्र करायची झाल्यास त्याचे प्रतीक असण्याची गरज निर्माण झाली. त्यातून आपल्या इष्टदेवतेच्या पादुका ठेवून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली आणि भक्तीचा हा एक नवमार्ग तयार झाला. नवविधा भक्तीमध्ये चौथी भक्ती ही पादुकांचीच सांगितली आहे.
आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पादुकांचा उल्लेख रामायणात आढळतो. भरताने श्रीरामाच्या पादुका ठेवून राज्यकारभार चालविला, हे सगळ्यांना माहीत आहे. पादुका म्हणजेच श्रीराम, ईश्वराचे प्रतीक आहेत. श्रीरामाच्या वतीनेच मी कारभार पाहत आहे, अशी दृढ भावना त्यामागे होती.
जे भज्य-पूज्य आहेत, त्यांच्या पादुकांची आपण पूजा करतो. व्यक्तिगत जीवनात एखाद्याला मान देताना त्या व्यक्तीच्या पाया पडतो. पाया पडताना ती व्यक्ती आपल्या समोर प्रत्यक्ष उपस्थित असते. मात्र, ती व्यक्ती समोर नसताना किंवा ती व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेल्यास ती व्यक्ती समोर आहे,
असा भाव मनात ठेवून पाया पडण्यासाठी पादुकांचा मार्ग अधिक सुकर असतो. पादुकांना केलेला नमस्कार त्या व्यक्तीपर्यंत जातो, अशा पद्धतीनेच आपले संस्कार आपल्या भारतीय परमार्थात चालत आलेले आहेत. कृष्णाच्या अवताराची एक कथा सांगितली जाते. कृष्णाला सत्यभामेने नारदांना दान केले. नारदाने कृष्णाला सामान्य माणसाप्रमाणे कामे सांगण्यास सुरुवात केली. यावर संत तुकाराम महाराजांनी सांगितले आहे की,
सत्यभामा दान करी, उजूर नाही अंगीकारी सेवेकाच्या शिरी, धरून चाले पादुका संत माहात्म्य एवढे मोठे असतात की, त्यांच्या पादुका प्रत्यक्ष परमेश्वरही आपल्या डोक्यावर धारण करू शकतो.
महाराष्ट्रात या पादुकांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आले. तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. तुकोबांनंतर देवस्थानचा कारभार कान्होबांनी पाहिला. त्यावेळी औरंगजेबाचे महाराष्ट्रावर आक्रमण सुरू झाले.
अशा काळात एक महत्त्वाची प्रतीकात्मक कृती झाली. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळाच्या आधीपासून लोक दिंडीने पंढरपूरला जात होते. वारी हा सामुदायिक परमार्थ आहे. दिंडीने जाताना परमात्म्याचे भजन करत जायचे.
ही धार्मिक भावना दृढ करण्यासाठी तसेच सगळे संत महात्मे आपल्या बरोबर आहेत, हे दाखवून लोकांची मनःशक्ती वाढविण्यासाठी तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी दिंडीला पालखीची जोड दिली.
पालखीमध्ये ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवल्या आणि ‘ज्ञानबा-तुकाराम’ म्हणत लोक तेव्हापासून वारीला जाऊ लागले. दिंडीचे पारमार्थिक स्वरूप बदलून पादुकांच्या माध्यमातून वारीचे रूप प्राप्त झाले.
पादुका पालखीत ठेवून त्यांचा सन्मान केला. ते आपल्या बरोबरच आहेत, हा भावही तयार केला. परकीय आक्रमणाच्या कालावधीत नारायण महाराजांनी आपली परंपरा, सेवाभाव टिकविण्यासाठी पादुकांच्या माध्यमातून पालखी सोहळा सुरू केला. मग, हळू हळू साऱ्या महाराष्ट्रातून पादुका पालख्या सोहळे होऊ लागले.
वारकरी संप्रदाय संतांच्या पादुका घेऊन निघतो, त्यावेळी या संतांच्या बरोबरीनेच आपण वारी करीत असल्याचा भाव असतो. पादुका सोहळ्याच्या माध्यमातून आपण संत, सद्गुरू अशा सर्वांचे विचार, आचार प्रत्यक्ष स्वीकारतो आणि त्या मार्गावर चालण्यासाठी कृती करतो. नुसता पादुकांना नमस्कार केला म्हणजे सगळे झाले असे नाही,
तर नमस्कार केल्यावर त्यांच्या सगळ्या गोष्टींचा स्वीकार आपण करतो. ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव आणि श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम’ हा महत्त्वाचा टप्पा आहे. विविध १८ सद्गुरू आणि संतांच्या पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी दाखवलेल्या पायवाटेवर चालण्याचा निर्धार व्यक्त करणे, हा होय. महाराष्ट्रातील पादुका परंपरा या माध्यमातून निश्चितच नवयुगाला दिशा देणारी ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.