Paduka Darshan Sohala 2024 : तुझ्या भक्तीने नाहला आनंदाचा सोहळा! ; श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाने गुरुसेवक भारावले

‘भेटी लागी जिवा लागलिसे आस’ अशी ओढ मनात ठेवून आलेल्या हजारो गुरुभक्तांमध्ये ‘धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन... अनंत जन्मांचा शीण गेला’ अशीच भावना दाटून आली होती.
Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024 sakal
Updated on

नवी मुंबई : ‘भेटी लागी जिवा लागलिसे आस’ अशी ओढ मनात ठेवून आलेल्या हजारो गुरुभक्तांमध्ये ‘धन्य आजि दिन झाले संताचे दर्शन... अनंत जन्मांचा शीण गेला’ अशीच भावना दाटून आली होती. दोन दिवस गुरुभक्तीत लीन झालेले गुरुसेवक एका वेगळ्याच आत्मिक समाधानाची अनुभूती घेत होते.

एकाच वेळी १८ संत व सद्‍गुरूंच्या पादुकांवर नतमस्तक होण्याचा योग घडून आल्याने भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम नवी मुंबईत पाहायला मिळाला. ‘सकाळ’तर्फे आयोजित अभूतपूर्व अशा पादुका दर्शन उत्सवात गुरुसेवकांच्या अलोट गर्दीमुळे फुललेला भक्तीचा मळा एक नवा अध्याय लिहून गेला.‘गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे, देवा मला एक तरी अशी संध्याकाळ दे... संगीताचे ज्ञान दे कंठामध्ये तान दे, तुझे गीत गाता यावे असे एक तरी वरदान दे’ अशी आर्त विनवणी प्रत्येक गुरुभक्त आपल्या सद्‍गुरुचरणी करत असतो. ‘

सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाईड’ प्रोग्रॅमअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवा’निमित्त त्यांची विनवणी फळाला आली. संत-महंतांच्या पादुकांच्या सहवासामुळे २६ आणि २७ मार्च असे दोन दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरचे एखाद्या तीर्थस्थानात परिवर्तन झाले होते, असेच म्हणावे लागेल. दैवी पर्वणीची अनुभूती घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून हजारो गुरुभक्त आले होते. एकीकडे पहिल्या दिवशी सकाळपासून सुरू झालेला गुरुसेवकांचा ओघ दुसऱ्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सुरू होता आणि दुसरीकडे भक्तिसोहळ्याचा एक नवा अध्याय लिहिला जात होता...

Paduka Darshan Sohala 2024
Paduka Darshan Sohala 2024 : सेवाभावाचा आनंद इतरांनाही मिळू द्या! ; डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले

‘रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून दोन दिवस परमात्म्याचे ध्यान करता आले. त्यातून मिळालेला अनुभव अवर्णनीय असा आहे. हरवलेली सुख-शांती परत मिळवण्याचे आणि सर्व गुरुसेवकांना अध्यात्माशी जोडण्याचे काम ‘सकाळ’च्या श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाने केले,’ अशी भावना सोहळ्यात सहभागी झालेल्या गुरुसेवकांनी उत्स्फूर्तपणे व्यक्त केली. असा आध्यात्मिक सोहळा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला. असे नियोजन यापूर्वी कधीही पाहण्यात आलेले नाही. शब्दांमध्ये वर्णन करता येणार नाही, असा अप्रतिम सोहळा पार पडला. खरे तर तो आणखी काही दिवस सुरू ठेवायला हवा होता. पुढील सोहळ्यासाठी आम्ही आतापासूनच अधीर झालो आहोत, असे सांगताना अनेक गुरुसेवकांचे डोळे पाणावले होते. प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर आणि डोळ्यात साक्षात गुरूंची भेट झाल्याचे भाव होते.

सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘सकाळ’तर्फे दोन दिवस ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. श्रीगुरू बालाजी तांबे यांच्या आशीर्वादाने झालेल्या पादुका दर्शन उत्सव सोहळ्यात सहभागी झाल्याचे समाधान सर्व स्तरांतून व्यक्त होत होते. २६ मार्चची सकाळ उजाडताच गुरुसेवकांच्या बरोबरीने असंख्य वारकरी संतपरंपरा जपणारी वेशभूषा धारण करून वाशीतील सिडको एक्झिबिशेन सेंटरमध्ये दाखल झाले. त्यांच्या सेवेला स्वयंसेवकांची मोठी फौज होती. एका शिस्तीत त्यांना पादुका मंदिरात सोडण्यात येत होते. मंदिरात प्रवेश करताना येत असलेली दिव्यत्वाची प्रचीती पाहून आपोआप सर्वांचे हात जोडले जात होते. सर्वांच्या डोळ्यात गुरुभेटीची एकच आस होती. राज्याच्या विविध ठिकाणांहून गुरुभक्त, वारकरी, कीर्तनकार, भाविक, साधक आणि सेवेकरी मंदिरात गटागटाने दाखल होत होते. प्रचंड गर्दीतही योग्य नियोजनामुळे त्यांना विनासायास गुरुचरणी नतमस्तक होता येत होते.

एक्झिबिशनचा भव्य परिसर झेंडे, टाळ-मृदंग आणि वारकऱ्यांनी फुलून गेला होता. सोहळ्याच्या दोन्ही दिवशी त्यांच्या भक्तिसंगीताचा वर्षाव गुरुसेवकांवर होत होता. मंदिराच्या प्रवेशद्वारीच विठुमाउली, शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची हुबेहूब प्रतिकृती लक्ष वेधून घेत होती. दिंडी, रिंगण सोहळा, बाल वारकऱ्यांच्या खेळांचे सादरीकरण, भजन-कीर्तन, हरिनामाचा गजर इत्यादींचा ओघ दोन दिवस सुरू होता. अनेक गुरुसेवक उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी होत एका अद्‍भुत क्षणाचे साक्षीदार होत होते. रांगेतही त्यांचा उत्साह कायम होता. दिव्यांग आणि वृद्धांसाठी व्हिलचेअरची सेवा उपलब्ध होती. स्वयंसेवक आणि गुरुसेवक त्यांच्या मदतीसाठी तत्पर होते. आध्यात्मिक गुरू श्री एम, ‘विश्व फाऊंडेशन’चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले, ‘एपी ग्लोबाले’चे संस्थापक आणि ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार आणि ‘संतुलन आयुर्वेद’चे एमडी सुनील तांबे यांनी उपस्थितांना जीवनाचे सार सांगून अध्यात्माचा संदेश दिला. ‘संकल्प ते सिद्धी सोहळ्या’चे महत्त्वही त्यांनी विशद केले.

चिंतन आणि मनन कक्षातील भक्तिमार्ग गुरुसेवकांसाठी अध्यात्माची शिदोरी ठरले. ज्ञानमार्ग, भक्ती मार्ग, सेवामार्ग व लक्ष्मी मार्गाच्या माध्यमातून त्यांनी जीवनाचे सार सांगण्यात आले. सोहळ्यानिमित्त असलेल्या महाप्रसादाचा लाभ हजारो गुरुसेवकांनी घेतला. तुझ्या भक्तीने नाहला आनंदाचा सोहळा, अशीच अनुभूती प्रत्येकाने घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.